अबब..! सात वर्षांत दीड पटीने वाढले थॅलेसेमियाग्रस्त; दर महिन्याला रक्त घेण्याची नामुष्की
By संतोष हिरेमठ | Published: May 8, 2023 06:47 PM2023-05-08T18:47:18+5:302023-05-08T18:49:40+5:30
जागतिक थॅलेसेमिया दिन :दिवसेंदिवस या रुग्णांची संख्या वाढत असून, बालकांचे प्रमाण जास्त आहे.
छत्रपती संभाजीनगर : शरीरात रक्तनिर्मिती बंद झाल्याने थॅलेसेमिया हा आजार होतो. त्याबरोबरच दोन ‘मायनर थॅलेसेमिया’ग्रस्तांनी विवाह केला तर जन्माला येणारे मूल ‘थॅलेसेमिया मेजर’ राहण्याची शक्यता असते. अशा मुलांना दर महिन्याला रक्त द्यावे लागते. चिंताजनक म्हणजे गेल्या सात वर्षांत थॅलेसेमियाग्रस्तांच्या संख्येत दीड पटीने वाढ झाली आहे.
दरवर्षी ८ मे हा दिवस जागतिक थॅलेसेमिया दिन म्हणून पाळण्यात येतो. दिवसेंदिवस या रुग्णांची संख्या वाढत असून, बालकांचे प्रमाण जास्त आहे. मराठवाड्यात या रुग्णांची संख्या सुमारे बाराशेवर आहे. या रुग्णांना १५ ते २५ दिवसांनी रक्त द्यावे लागते. शरीरात रक्तनिर्मिती बंद झाल्याने हा आजार होतो.
किती वाढले रुग्ण?
थॅलेसेमिया सोसायटी सचिव अनिल दिवेकर म्हणाले, आमच्याकडे २०१६ मध्ये १७० थॅलेसेमियाग्रस्तांची नोंद झाली होती. संख्या आता तीनशेवर गेली आहे. अगदी सहा महिन्यांच्या शिशूचीही नोंद झाली. या सर्वांना नियमितपणे रक्त द्यावे लागते. शहरातील एकूण रुग्णांची संख्या आठशेच्या घरात आहे.
जनुकीय आजार
थॅलेसेमिया हा जनुकीय आजार आहे. रुग्णाला संपूर्ण आयुष्य १५-२० दिवसांच्या अंतराने रक्त द्यावे लागते. बाह्य रक्ताच्या नियमित पुरवठ्याने रक्तातील लोहाचे प्रमाण मर्यादेपलीकडे वाढते. त्यामुळे अतिरिक्त औषधांची गरज असते.
- डाॅ. मंजुषा कुलकर्णी, संचालक, दत्ताजी भाले रक्त केंद्र
जीन्समध्ये असामान्यता
लाल रक्तपेशीमधील हिमोग्लोबीनच्या निर्मितीशी संबंधित असलेल्या जीन्समध्ये असामान्यता हे थॅलेसेमियाचे कारण आहे. आनुवंशिक दोष वारसाने येतो. जीन्समध्ये असलेल्या या असामान्यतेचे निम्मे प्रमाण दोन्ही पालकांमध्ये असल्यास (थॅलेसेमिया ट्रेट) यांच्या अपत्यामध्ये २५ टक्के हा आजार उद्भवतो, तर ५० टक्के अपत्ये कॅरिअर्स (निम्मे दोषवाहक) असतात.
- डॉ. अभिषेक परळीकर, बालरोगतज्ज्ञ
थॅलेसेमियाची लक्षणे...
- लाल रक्तपेशींच्या क्षतीमुळे गडद रंगाची लघवी होणे.
- थकवा.
- पिवळी किंवा निस्तेज त्वचा.
- उशिरा आणि संथ वाढ.
- अंगावर सूज येणे.
- कॅरिअर्समध्ये या रोगाची नगण्य चिन्हे दिसतात किंवा चिन्हे दिसतही नाहीत.
थॅलेसेमिया कसा टाळावा?
- जनसामान्यांमधील थॅलेसेमिया ट्रेट (निम्मे दोष असलेले) ओळखावेत.
- दोन थॅलेसेमिया ट्रेट यांच्यात विवाह टाळावा.
- विवाहित जोडपे थॅलेसेमिया ट्रेट असल्यास गर्भधारणा झाल्यावर गर्भ चाचणीद्वारे थॅलेसेमियाचे लवकर निदान करावे.
- नाते संबंधामध्ये विवाह टाळावा.