सत्तार अन् मी जुने मित्र, भोकरदनची हुकुमशाही मोडीत काढू; खासदार काळेंचा दानवेंना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 19:17 IST2025-01-09T19:13:33+5:302025-01-09T19:17:19+5:30
आम्हाला बघून घ्यायची भाषा काय करता, जनतेनेच त्यांना बघून घेतले आहे: कल्याण काळे

सत्तार अन् मी जुने मित्र, भोकरदनची हुकुमशाही मोडीत काढू; खासदार काळेंचा दानवेंना इशारा
सिल्लोड/ भराडी: रावसाहेब दानवे यांना हिंदुत्व आता दिसत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणात महिलांवर लाठी हल्ला झाला त्यावेळी ते कुठे गेले होते. आम्हाला बघून घ्यायची भाषा काय करता, जनतेनेच त्यांना बघून घेतले आहे. अब्दुल सत्तार व मी जुने मित्र आहोत अन् आम्ही मैत्री निभावणार. दोघे सोबत काम करून मतदार संघाचा विकास करू. भोकरदनची मनमानी मोडित काढू, असा इशारा खासदार कल्याण काळे यांनी भराडी येथील सभेतून माजी खासदार रावसाहेब दानवे यांना दिला.
गुरुवारी दुपारी १२ वाजता सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथील पूर्णा नदीवर भुरडी नदी, वांगी बुद्रुक येथील गाव नाला तर उपळी व मांडगाव येथील अंजना नदीवर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत मंजूर १२ कोटी ५५ लाख ८१ हजार रुपयांच्या एकूण ५ पुलांच्या बांधकामाचे भूमिपूजन खा. डॉ. कल्याणराव काळे यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजीमंत्री आ. अब्दुल सत्तार होते. यावेळी सत्तार म्हणाले, सिल्लोड तालुक्यातील आणखी काही गावांसाठी ५० कोटींच्या रस्त्यांना मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तालुक्यातील विकासासाठी आम्ही दोघे निधी कमी पडू देणार नाही. खा. कल्याणराव काळे यांच्या पुढाकाराने अनेक दिवसांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार असल्याचेही सत्तार यावेळी म्हणाले.
यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन गाढे, बाजार समितीचे सभापती केशवराव पा. तायडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम पा. महाजन, युवानेते माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर, नंदकिशोर सहारे, राजेंद्र ठोंबरे, सयाजी वाघ, सुधाकर पाटील, प्रवीण मीरकर, राजू गौर, निजाम पठाण, काँग्रेस तालुकाध्यक्ष भास्कर घायवट, व्हाईस चेअरमन अनिस पठाण, रमेश साळवे, दामूअण्णा गव्हाणे, सरपंच पप्पू जगनाडे, उपसरपंच गजानन महाजन, गणेश गरुड यांची उपस्थिती होती.
भोकरदनची हुकुमशाही मोडीत काढू
तर खासदार काळे म्हणाले, आ. अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात सर्वाधिक विकास कामे सिल्लोड मतदारसंघात झाली. ते सर्वांना सोबत घेऊन चालतात. त्यांची लोकप्रियता फार मोठी आहे. रावसाहेब दानवे यांच्यावर टीका करताना काळे म्हणाले, दानवे यांना पराभव जास्तच जिव्हारी लागला. मला आणि आ. अब्दुल सत्तार यांना सोबत पाहून भोकरदनच्या भुवया उंचावतात. अब्दुल सत्तार यांनी पाच वर्षात १० हजार सिंचन विहिरींना मान्यता दिली. भोकरदनमध्ये एकही विहीर मंजूर नाही. शासनाच्या लाभाच्या योजना भोकरदन, जाफराबाद मधील लोकांना मिळत नाहीत. जालन्यात हम बोलेसो कायदा होता, पण आता तसे होणार नाही. त्यांची हुकूमशाही मोडीत काढू, असा इशारा खासदार काळे यांनी दिला.