अब्दुल सत्तार, साबेर खानमध्ये बाचाबाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:04 AM2021-07-30T04:04:11+5:302021-07-30T04:04:11+5:30
वैजापूर : राज्यमंत्री अब्दुल सत्तार व वैजापूर उपनगराध्यक्ष साबेर खान यांच्यात गुरुवारी शहरात झालेल्या एका कार्यक्रमात जोरदार बाचाबाची झाली. ...
वैजापूर : राज्यमंत्री अब्दुल सत्तार व वैजापूर उपनगराध्यक्ष साबेर खान यांच्यात गुरुवारी शहरात झालेल्या एका कार्यक्रमात जोरदार बाचाबाची झाली. त्यामुळे कार्यक्रमस्थळी वातावरण चांगलेच तापले होते. जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत ही घटना घडली.
महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे गुरुवारी वैजापूर दौऱ्यावर होते. दुपारी १ वाजेदरम्यान त्यांनी एका मंगल कार्यालयात साखरपुड्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावेळी तेथे उपस्थित असलेले शिवसेनेचे उपनगराध्यक्ष साबेर खान यांना त्यांनी दुरुनच नमस्कार केला. मात्र साबेर खान यांनी त्यांचेकडे दुर्लक्ष केले. यानंतर सत्तार हे डेपो रोडवरील एका कार्यक्रमाला उपस्थित राहिले. तेथे बोलताना त्यांनी साबेर खान हे वृद्ध झाले असून ते बहिरे झाल्याची कोपरखळी मारली. येथे साबेर खान उपस्थित नव्हते, मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही बाब त्यांच्यापर्यंत पोहोचविली. तोपर्यंत सत्तार हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एका कार्यक्रमाला हजर झाले होते. आपल्याबद्दल सत्तार यांनी केलेल्या टिप्पणीवर साबेर खान हे चांगलेच संतापले होते. ते कार्यालयातून थेट सत्तार बोलत असलेल्या कार्यक्रमात आले. तेथे भर सभेत ते सत्तार यांचेवर धाऊन गेले. व तुम्ही माझी बदनामी का केली, असा जाब विचारला. यावेळी सत्तार व साबेर खान यांच्यात चांगलीच हमरीतुमरी झाली. यावेळी तेथे जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे, आ. रमेश बोरनारे, जि. प. सभापती अविनाश गलांडे, किशोर बलांडे, दिनेश परदेशी, शिल्पा परदेशी, बाळासाहेब संचेती, नितीन पाटील आदी उपस्थित होते. अचानक झालेल्या या प्रकारामुळे उपस्थित सर्वजण अवाक् झाले.
शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर
शिवसेनेचे साबेर खान हे उपनगराध्यक्ष असून वैजापुरात त्यांचे चांगले प्रस्थ आहे. किरकोळ कारणावरुन त्यांचा व राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा वाद झाल्यानंतर शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. बाकीच्या नेत्यांनी कार्यक्रमस्थळी हस्तक्षेप केल्याने पुढील वाद टळला. मात्र, या प्रकाराची चर्चा वैजापुरात दिवसभर होत होती.