अब्दुल सत्तार ठरले शिंदे सरकारचे पहिले लाभार्थी; सिल्लोडमधील सूतगिरणीला १५ कोटींचा निधी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 12:29 PM2022-07-18T12:29:20+5:302022-07-18T12:30:04+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागच्या सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना सत्तार यांनी सिल्लोडमध्ये २०० कोटींच्या आसपासचा निधी एक हाती मिळविला.
औरंगाबाद : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचे पहिले लाभार्थी आ. अब्दुल सत्तार ठरले आहेत. त्यांच्या सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात वस्त्रोगास चालना देण्यासाठी प्रस्तावित सूतगिरणीचा मार्ग मोकळा झाला आहे. नॅशनल सहकारी सूतगिरणीला शासकीय भागभांडवल म्हणून ८१ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या अंतर्गत पहिला टप्पा म्हणून १५ कोटी २६ लाख रुपयांचे शासकीय भागभांडवल देण्याचा निर्णयदेखील झाला आहे. वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटीया यांनी शासननिर्णयानुसार आ. सत्तार यांना पहिल्या टप्प्यातील निधी मिळण्याचा अध्यादेश सुपूर्द केला.
या निर्णयामुळे सिल्लोडमध्ये नॅशनल सूतगिरणी उभारणीस गती मिळणार आहे. महिन्याभरात सूतगिरणीसाठी जागा निश्चित होईल. त्यानंतर तीन महिन्यांत आर्थिक सक्षमतेच्या अहवालासह अटी व शर्तींसह समभाग भांडवल तपासले जाईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागच्या सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना सत्तार यांनी सिल्लोडमध्ये २०० कोटींच्या आसपासचा निधी एक हाती मिळविला. त्यातूनच त्यांची शिंदेसोबत जवळीक वाढली. गेल्या आठवड्यात मुंबईत शिंदे यांच्यासाठी शक्तिप्रदर्शन करताना त्यांनी सूतगिरणीच्या मुद्द्याला हवा दिली, मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने त्यांचा प्रस्ताव मंजूर केला. अशा पद्धतीने शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या पंधरवड्यात १५ कोटी ८१ लाखांचा निधी पदरात पाडून घेणारे आ. सत्तार हे पहिले लाभार्थी ठरले आहेत.
काँग्रेस ते शिवसेना मार्गे शिंदे सेना
२०१९ मध्ये काँग्रेसला सोडल्यानंतर आ. सत्तार यांनी भाजपमध्ये जाण्याची तयारी केली; परंतु विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. महसूल राज्यमंत्रिपदी संधी मिळाल्याने अडीच वर्षे मातोश्री आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच आपले दैवत असल्याचे जाहीरपणे सांगितले; परंतु मुख्यमंत्री शिंदे यांच्या ते अधिक जवळ गेले.
१०७ गावांसाठी वाॅटर ग्रीडला मंजुरी
सिल्लोड तालुक्यातील १०७ गावांसाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ६६५ कोटी रुपयांच्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत वॉटर ग्रीड पाणीपुरवठा योजनेस देखील प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. जिल्ह्यातील ही दुसरी वॉटर ग्रीड योजना आहे. पहिली वाॅटर ग्रीड योजना पैठण तालुक्यात मंजूर झाली आहे.