अब्दुल सत्तार यांनी भरला अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 11:26 PM2019-04-03T23:26:39+5:302019-04-03T23:27:07+5:30
सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आज दुपारी ३ वा. अनपेक्षितपणे अपक्ष उमेदवार म्हणून आपला अर्ज भरला. त्यांचे सूचक म्हणून माजी खासदार रामकृष्णबाबा यांची सही आहे व अर्ज भरताना ते स्वत:ही हजर होते.
औरंगाबाद : सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आज दुपारी ३ वा. अनपेक्षितपणे अपक्ष उमेदवार म्हणून आपला अर्ज भरला. त्यांचे सूचक म्हणून माजी खासदार रामकृष्णबाबा यांची सही आहे व अर्ज भरताना ते स्वत:ही हजर होते.
आमखास मैदानावर आपल्या समर्थकांचा मेळावा घेऊन सत्तार यांनी कौल घेतला होता. विचारलेल्या तीन प्रश्नांपैकी शेवटच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांच्या समर्थकांनी अपक्ष म्हणून औरंगाबादची लोकसभा निवडणूक लढवू नका, असे बजावले होते. तरीही सत्तार यांनी आज तसाच अर्ज भरला. हा त्यांच्या समर्थकांचा अपमान असून, असेच करावयाचे होते, तर मग मेळावा कशासाठी घेतला असा प्रश्न उपस्थित होत आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे उद्या दि.४ एप्रिल रोजी सत्तार हे अर्ज भरणार, अशी चर्चा सुरू असतानाच चकवेगिरी करीत आजच त्यांनी अर्ज भरला. रामकृष्णबाबा यांच्यासह कन्नडचे अशोक मगर, दलित पँथरचे संजय जगताप एवढीच मोजकी मंडळी अर्ज भरताना होती. ८ एप्रिल ही तारीख उमेदवारी मागे घेण्याची असून, तोपर्यंत अब्दुल सत्तार यांच्या संदर्भात काय काय घटना घडतात, हे पाहणे औत्सुक्याचेच ठरणार आहे.