अब्दुल सत्तार शक्तिप्रदर्शनाच्या तयारीत; कोणता गौफ्यस्फोट करणार? राजकीय वर्तुळात उत्सुकता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 11:40 IST2024-12-31T11:37:09+5:302024-12-31T11:40:01+5:30
आ. अब्दुल सत्तार यांना यंदा मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यामुळे सत्तार यांची अस्वस्थता बरीच वाढली आहे.

अब्दुल सत्तार शक्तिप्रदर्शनाच्या तयारीत; कोणता गौफ्यस्फोट करणार? राजकीय वर्तुळात उत्सुकता
छत्रपती संभाजीनगर : माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली नसली तरी खचून न जाता त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू केली असून, नववर्षाच्या पहिल्या दिवशी त्यांनी नागरी सत्काराच्या निमित्ताने मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर भव्य कार्यक्रम आयोजित केला आहे.
माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडताना केलेल्या बंडात त्यांचे शिलेदार म्हणून सर्वांत आघाडीवर असलेले आ. अब्दुल सत्तार यांना यंदा मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यामुळे सत्तार यांची अस्वस्थता बरीच वाढली आहे. त्यातच सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी विविध आरोपांच्या माध्यमाने सत्तार यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले.
माझ्या नावातच ‘सत्ता’ असल्याचे अनेकदा अब्दुल सत्तार यांनी जाहीरपणे सांगितले. “जिथे सत्ता तिथे मी’’ असे समीकरणच जुळले असल्याचा दावा ते करीत आले. अलीकडेच झालेली विधानसभा निवडणूक सत्तार यांना बरीच जड गेली. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सुरेश बनकर यांनी तगडे आव्हान उभे केले. अवघ्या २४२० मतांनी सत्तार विजयी झाले. सलग चौथ्यांदा ते निवडून आले. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात हमखास स्थान मिळेल, असा तर्क लावला जात होता. मंत्रिपदासाठी स्पर्धा सुरू झाली तेव्हा सत्तार यांचे नाव चर्चेत नव्हते. माध्यमांमध्ये त्यांचा पत्ता कट झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. प्रत्यक्षात जेव्हा मंत्री निवडण्याची वेळ आली तेव्हा सत्तार यांना मंत्रिमंडळात स्थान न देण्याचा निर्णय शिंदेसेनेने घेतला.
सत्तार यांना घरचा अहेर...
मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने सत्तार यांनी आपली नाराजी उघडपणे बोलूनही दाखविली. त्यातच सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी त्यांच्यावर केलेले आरोप घरचा अहेरच ठरला. दोन्ही नेते एकाच पक्षातील असताना या आरोपांच्या फैरीवरून सर्वसामान्यांच्या भुवया उंचावल्या.
शक्तिप्रदर्शनात काय बोलणार?
१ जानेवारी रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सत्तार यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. या समारंभात सत्तार कोणत्या आरोपांची तोफ डागणार याकडे राजकीय मंडळींसह सर्वसामान्यांचेही लक्ष लागले आहे.