अब्दुल सत्तार छत्रपती संभाजीनगरचे नवे पालकमंत्री, मंत्रिमंडळ विस्ताराचे काय?

By विकास राऊत | Published: July 25, 2024 11:57 AM2024-07-25T11:57:16+5:302024-07-25T11:57:36+5:30

संदीपान भुमरे यांचा आमदारकीसह मंत्रिपदाचा राजीनामा

Abdul Sattar is the new Guardian Minister of Chhatrapati Sambhajinagar | अब्दुल सत्तार छत्रपती संभाजीनगरचे नवे पालकमंत्री, मंत्रिमंडळ विस्ताराचे काय?

अब्दुल सत्तार छत्रपती संभाजीनगरचे नवे पालकमंत्री, मंत्रिमंडळ विस्ताराचे काय?

छत्रपती संभाजीनगर : खासदार झाल्यामुळे संदीपान भुमरे यांनी आमदारकीसह मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी राज्याचे पणनमंत्री तथा सिल्लाेड मतदारसंघाचे आ. अब्दुल सत्तार यांची नियुक्ती करण्यात आली. सत्तार यांच्याकडे हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही आहे. सत्तार हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पहिले अल्पसंख्याक पालकमंत्री ठरले आहेत.

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ५० दिवस खा. भुमरे हेच पालकमंत्री म्हणून राहिले. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर सत्तार यांच्याकडे पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री कुणाला करावे, यावरून शिंदेसेनेत बराच खल झाला. या काळातील सत्तार यांचे ‘शिंदे यांच्याशी माझा प्रासंगिक करार आहे,’ हे वक्तव्य चर्चेचे ठरले होते. हे राजकीय महाभारत सुरू असतानाच भाजपने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन पालकमंत्रिपदी अतुल सावे यांना संधी मिळावी, अशी मागणी केली. यावरून शिंदेसेना आणि भाजपमध्ये शीतयुद्ध सुरू झाले. खा. भुमरे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, राजीनामा मागेच दिला होता. तो मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्रिपदाची जबाबदारी सत्तार यांच्याकडे सोपविली.

आता मंत्रिमंडळ विस्ताराचे काय?
विधानसभा निवडणुका दोन महिन्यांवर असून, आता तरी इच्छुकांना मंत्रिपद द्यावे, यासाठी बुधवारी दुपारी काही आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. शिंदेसेनेचे आ. संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तार होणार असून, उर्वरित दोन महिन्यांसाठी अनेकांना मंत्रिपदी संधी देण्याचा शब्द नेतृत्वाने दिला आहे. त्यामुळे विस्तार होईल आणि अनेक इच्छुकांना संधी मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

जिल्ह्यातील आजवरचे अल्पसंख्याक नेतृत्व
मागील पाच दशकांमध्ये डॉ. रफिक झकेरिया, अब्दुल अजीम, अमानउल्ला मोतीवाला, इम्तियाज जलील, अब्दुल सत्तार या अल्पसंख्याक समाजातून आलेल्यांनी विविध मतदारसंघांचे नेतृत्व केले. यातील डॉ. झकेरिया, अब्दुल अजीम यांनी मंत्रिपद भूषविले. त्यानंतर सत्तार यांना ती संधी मिळाली; परंतु पालकमंत्रिपदाची संधी सत्तार यांनाच मिळाली.

पालकमंत्री सत्तार शुक्रवारी येणार
जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर या पदाची जबाबदारी दिली असून, अल्पसंख्याक समाजाच्या नेतृत्वाला पहिल्यांदाच ही संधी मिळाली आहे. शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये येणार असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.

Web Title: Abdul Sattar is the new Guardian Minister of Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.