अब्दुल सत्तार यांची वादग्रस्त वक्तव्ये, कोर्ट केसेसमुळे मंत्रीपदाची संधी हुकली !
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 19:59 IST2024-12-16T19:57:38+5:302024-12-16T19:59:51+5:30
अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपच्या नेत्यांचा देखील विरोध असल्याची चर्चा होती.

अब्दुल सत्तार यांची वादग्रस्त वक्तव्ये, कोर्ट केसेसमुळे मंत्रीपदाची संधी हुकली !
छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड मतदारसंघाचे चार वेळा प्रतिनिधित्व करणारे आमदार अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकले आहे. निवडणूक काळात केलेली वादग्रस्त वक्तव्ये आणि न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यांमुळे शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तार यांना वगळल्याची चर्चा आहे.
शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदे यांना साथ देणारे आ. सत्तार यांची मागील अडीच वर्षे मंत्रिमंडळात वर्णी लागली होती. कृषी, अल्पसंख्याक विकास आणि वक्फ अशी खाती त्यांनी सांभाळली. शिवाय, लोकसभा निवडणुकीनंतर छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारीदेखील त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांनी काही वादग्रस्त वक्तव्ये केली. विशेषत: मी मुख्यमंत्री बदलू शकतो अथवा सरकार बनवू शकतो, अशा वक्तव्यांमुळे त्यांच्याविषयी शिंदेसेनेत नाराजी होती. शिवाय, सत्तार यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपच्या नेत्यांचा देखील विरोध असल्याची चर्चा होती.
आ. सत्तार यांच्या विरोधात न्यायालयात काही खटले दाखल आहेत. हे खटले जमिनीचे व्यवहार आणि त्यांच्याशी संबंधित शिक्षण संस्थेशी संबंधित आहेत. शिवाय, आ. संजय शिरसाट यांचा देखील मंत्रिपदावर दावा होता. एकाच जिल्ह्यातून दोघांना संधी देणे शक्य नसल्याने शिवसेनेकडून सत्तार यांच्या ऐवजी शिरसाट यांना संधी देण्यात आली आहे.