अभयदेवसुरिश्वर महाराजांचे सिडकोत आगमन
By Admin | Published: June 14, 2016 11:34 PM2016-06-14T23:34:06+5:302016-06-14T23:59:27+5:30
औरंगाबाद : गुरूराम जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित विजय अभय महोत्सवांतर्गत मंगळवारी सकाळी ६.३० वाजता आचार्यश्री अभयदेवसुरिश्वरजी महाराज व साधू-साध्वीजींचे सिडकोत आगमन झाले.
औरंगाबाद : गुरूराम जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित विजय अभय महोत्सवांतर्गत मंगळवारी सकाळी ६.३० वाजता आचार्यश्री अभयदेवसुरिश्वरजी महाराज व साधू-साध्वीजींचे सिडकोत आगमन झाले.
सेव्हन हिल परिसरातील इंदरचंद संचेती यांच्या निवासस्थानापासून सकाळी पदयात्रेला सुरुवात झाली. मंगल कलश डोक्यावर घेऊन अग्रभागी महिला चालत होत्या. महाराजांच्या पाठीमागे शिष्य जयघोष करीत चालत होते. जालना रोडमार्गे पदयात्रा सिडको एन-३ येथील शंखेश्वर पार्श्वनाथ जैन जिनालय येथे आली. यानंतर आयोजित कार्यक्रमात आचार्य विजय अभयदेवसुरिश्वरजी महाराज म्हणाले की, या जगात विश्वविजेते म्हणून अनेक महायोद्धे गाजले. नेपोलियन, सिकंदर, हिटलर अशा महत्त्वाकांक्षी वीरांनी मोठे मोठे विजय प्राप्त केले; परंतु अंती सारेच पराभूत झाले. भगवान महावीरांनी आयुष्यातील प्रत्येक समस्येला अहिंसेच्या मार्गानेच उत्तर शोधले. शस्त्राच्या बळावर जग जिंकू पाहणारे काळाच्या ओघात कुठे गडप झाले कोण जाणे; परंतु आज भगवान महावीर आणि त्यांनी दाखविलेला मार्ग प्रत्येक व्यक्तीच्या मनात, हृदयात वसलेला आहे. त्यामुळेच अहिंसेच्या मार्गाने विजय प्राप्त करवून देणारा, मन:परिवर्तन करणारा मार्ग हाच भगवान महावीरांचा मार्ग ठरतो, असे महाराजांनी सांगितले. यानंतर जिनालयात आचार्यश्रींच्या मार्गदर्शनाखाली संघशांती, गृहशांतीसाठी शांतीधारा अभिषेक करण्यात आला. यावेळी सिडकोतील गुरूगौतम वर्धमान श्वेतांबर जैन श्रावक संघ तसेच अभय महामहोत्सवाचे अध्यक्ष आ.सुभाष झांबड, सुरेश चंडालिया, रतिलाल मुगदिया, नवीनचंद चंडालिया, डॉ. प्रकाश झांबड, जी. एम. बोथरा यांच्यासह सिडकोतील भाविकांची उपस्थिती होती.