औरंगाबादहून दोन नवीन विमानसेवा सुरू होण्याची क्षमता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 05:50 PM2019-06-28T17:50:56+5:302019-06-28T17:52:18+5:30

उदयपूरसह नव्या शहरांबरोबर हवाई कनेक्टिव्हिटी मिळण्याची अपेक्षा

The ability to start two new flights from Aurangabad | औरंगाबादहून दोन नवीन विमानसेवा सुरू होण्याची क्षमता

औरंगाबादहून दोन नवीन विमानसेवा सुरू होण्याची क्षमता

googlenewsNext
ठळक मुद्देपर्यटन, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांची मागणीऔरंगाबादहून जेट एअरवेजकडून सकाळी आणि सायंकाळी विमानसेवा सुरू होती.

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करणारी जेट एअरवेजची दोन विमाने बंद झालेली आहेत. त्यामुळे औरंगाबादहून दिल्ली, मुंबईसाठी किमान दोन नवीन विमानसेवा सुरू होण्याची क्षमता आहे. त्याबरोबर नव्या विमान कंपनी औरंगाबादेत आल्यास उदयपूरसह नव्या शहरांबरोबर हवाई कनेक्टिव्हिटी मिळण्याची अपेक्षा उद्योग, पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. 

औरंगाबादहून जेट एअरवेजकडून सकाळी आणि सायंकाळी विमानसेवा सुरू होती. सायंकाळच्या वेळेत मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमानाने दररोज १३४ प्रवाशांची ये-जा होत होती. एअर इंडिया, ट्रूजेट आणि जेट एअरवेज कंपनीच्या विमानसेवेमुळे औरंगाबाद शहर दिल्ली, मुंबई, हैदराबाद, तिरुपतीशी हवाई सेवेने जोडले गेले. मात्र, आता जेट एअरवेजची सेवा बंद झाली. परिणामी केवळ दोन कंपन्यांचीच सेवा उरली. सध्या दिल्ली, मुंबईला जाण्यासाठी प्रवाशांना एकमेव एअर इंडियाच्या विमानाचा आधार आहे. परंतु या विमानाची बुकिंग फुल होणे, अधिक तिकीट दर अशा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.  जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेणी असलेल्या औरंगाबादेत जेट एअरवेजचे विमान बंद झाल्याने अनेक लोक बेरोजगार झाले. पर्यटन, उद्योग क्षेत्रांवर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर किमान दिल्ली, मुंबईसाठी विमानसेवा सुरू करण्याची मागणी होत आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींपासून उद्योजक, हॉटेल व्यावसायिक, पर्यटन क्षेत्रातील लोकांकडून प्रयत्न सुरू आहे. 

‘इंडिगो’नेही दर्शविली सकारात्मकता
इंडियन असोसिएशन आॅफ टूर आॅपरेटरने गुरुवारी (दि.२७) ‘इंडिगो’च्या मुख्य वाणिज्य अधिकाऱ्यांकडे औरंगाबाद आणि दिल्लीहून विमानसेवा सुरू करण्याची मागणी के ली आहे. यामध्ये दिल्ली-औरंगाबाद-दिल्ली, मुंबई-औरंगाबाद-मुंबई, मुंबई-औरंगाबाद-उदयपूर-औरंगाबाद-मुंबई आणि दिल्लीहून खजुराहो-वाराणसीसाठी विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली आहे. याचा या कंपनीने सकारात्मक विचार केला आहे. ‘जेट’मधून आलेले अधिकारी आमच्याशी जोडले गेले आहेत. त्यांना या मार्गांसंबंधी अधिक चांगली माहिती आहे. त्यामुळे या मार्गांसंबंधी पडताळणी, क्षमता पाहिली जाईल, असे ‘इंडिगो’ने इंडियन असोसिएशन आॅफ टूर आॅपरेटरला कळविली आहे. 

स्पाईस जेटच्या अधिकाऱ्यांनी केली विमानतळावर पाहणी
चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाला गुरुवारी स्पाईस जेटच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन सोयी-सुविधा आणि प्रवासी क्षमतेचा आढावा घेतला. यामुळे लवकरच स्पाईस जेटकडून औरंगाबादहून विमानसेवा सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. स्पाईस जेटकडून दिल्ली, मुंबईसाठी विमानसेवा सुरू होण्याची चिन्हे आहेत.
 

प्रयत्नांना यश मिळेल
यापूर्वी विमानसेवेसाठी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न केला जात होता. मात्र, आता सर्वांनी एकत्रितपणे पाठपुरावा सुरूकेला आहे. त्यामुळे सगळ्यांच्या प्रयत्नांना यश मिळण्याची चिन्हे आहेत. औरंगाबादहून लवकरच नवीन विमान सुरू होईल.
- जसवंत सिंह राजपूत, अध्यक्ष, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फोरम

 

Web Title: The ability to start two new flights from Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.