गर्भपाताचे रॅकेट: कंपाऊंडरचा झाला बोगस डॉक्टर; तीन मजली रुग्णालय थाटून जमवली माया
By सुमित डोळे | Published: May 22, 2024 01:54 PM2024-05-22T13:54:05+5:302024-05-22T13:54:18+5:30
रॅकेट उघडकीस येताच गर्भपातासाठीचे २ हजार इंजेक्शन, औषधांचा साठा जाळून बोगस डॉक्टर कुटुंबासह पसार
छत्रपती संभाजीनगर : गर्भपाताच्या रॅकेटमध्ये आता जिल्ह्याबाहेरील आयुर्वेदिक डॉक्टरांसह बोगस डॉक्टरही सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले आहे. दहा वर्षे कंपाऊंडर राहिलेल्या बालाजी तळेकर (ता. भोकरदन, जि. जालना) याने चोरमारेवाडीमध्ये थेट तीन मजली रुग्णालय थाटून स्वत:च डॉक्टर झाला होता. दुसऱ्या परवान्यावर मेडिकल सुरू करून विज्ञान, औषधशास्त्राचे कुठलेही शिक्षण नसलेल्या काकासाहेब खेकाळे (रा. पेजनापूर) याला ते चालवायला दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. शहरात रॅकट उघडकीस येताच दोघेही रुग्णालय साफ करून, औषधी जाळून पसार झाले.
सविता व साक्षी थोरात या मायलेकी चालवत असलेल्या गर्भलिंगनिदान रॅकेट सिल्लोडमध्ये गर्भपात करणाऱ्या डॉ. रोशन ढाकरेपर्यंत पोहोचले. पुंडलिकनगर पोलिसांनी यात आतापर्यंत जवळपास १३ आरोपी निष्पन्न करून १० आरोपींना अटक केली. आठ दिवसांपूर्वी ढाकरेला अटक झाल्यानंतर निरीक्षक राजेश यादव यांच्या पथकाला भोकरदन तालुक्यातील एका बोगस डॉक्टरचे सबळ पुरावे हाती लागले. रविवारी सकाळी चोरमारेवाडीत धाड टाकल्यावर मात्र पथक बोगस डॉक्टर तळेकरचे रुग्णालय पाहून थक्क झाले. त्याला गर्भपातासाठी औषध पुरवणारा खेकाळेदेखील घरी मिळून आला नाही.
औषधांची राख, शेतातील घराला कुलूप
सविता, साक्षीला पकडल्यानंतरदेखील तळेकरचे बोगस रुग्णालय सुरू होते. मात्र, ढाकरेला अटक होताच तळेकरने रुग्णालय स्वच्छ करून कुलूप लावून पसार झाला. यादव यांच्यासह सहायक फौजदार सुनील मस्के, दीपक देशमुख, गणेश डोईफोडे, दीपक जाधव, सुरेश पवार यांनी रविवारी आसपासचा सर्व परिसर पिंजून काढला. तेव्हा रुग्णालयाच्या काही अंतरावर जवळपास २ हजार इंजेक्शन, गर्भपाताच्या कीट व औषधांचा साठा, रिपोर्ट्स जाळून टाकल्याचे आढळले. घराला कुलूप लावून दोघांचे कुटुंबदेखील पसार झाले आहे. यात मंठा, बीडमधील संशयित डॉक्टरदेखील पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
५० मिनिटांचा युक्तिवाद, नातेवाइकांना अश्रू अनावर
सोमवारी सर्व आरोपींना तिसऱ्यांदा न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींच्या संपत्तीची तपासणी, कारागृहात असलेल्या डॉ. सतीश सोनवणे व साक्षी, सविताची समोरासमोर चौकशी गरजेचे असून आरोपींनी हजारो गर्भपात करून मोठी संपत्ती जमा केल्याचा संशय असून सरकारी वकील आमेर काजी यांनी केला. ५० मिनिटे सरकारी व विराेधी पक्षांचा युक्तिवाद चालला. त्यानंतर न्या. एस. एस. रामदीन यांनी साक्षी, सविता, रोशनसह गोपाल कळांत्रे, नारायण पंडित, संदीप काळे, सदाशिव काकडे, सतीश टेहरेला २४ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. कक्षाच्या बाहेर येताच ढाकरेकडे काम करणाऱ्या कर्मचारी व नातेवाईक धाय मोकलून रडले.
कंपाऊंडरचा डॉक्टर, दुसऱ्याच्या परवान्यावर रुग्णालय
तळेकर दहा वर्षे राजुरी येथील एका डॉक्टरकडे कंपाऊंडर होता. काही वर्षांपूर्वी त्याने चोरमारेवाडीत ढाकरेच्याच रुग्णालयाच्या नावाने तीन मजली इमारतीत रुग्णालय थाटले. तेथे पोलिसांना त्याच्या ३ आलिशान कारदेखील आढळल्या. खेकळेला गुरुमाऊली नावाने मेडिकल चालवायला दिले. याच नावाने आणखी एक मेडिकल असल्याने एकाच परवान्यावर ते बाेगस रुग्णालय, मेडिकल चालवत असून तेथूनच सर्व औषधांचा पुरवठा होत होता. एक दोन गर्भपात असले तर सोपे गेले असते, पण या रॅकेटद्वारे हजारो गर्भपात झाल्याचा दावा सरकारी पक्षाने न्यायालयात केला.
डीएनए तपासणी करायची पण....
सिल्लोड परिसरात पुरलेल्या अर्भकाची व काळेच्या पत्नीच्या डीएनएची तपासणी पोलिसांना करायची आहे. मात्र, मंठ्यातून तिच्यासह तिचे माहेरचे सदस्यदेखील पसार झाले आहे. सोमवारी सकाळी पुंडलिकनगर पोलिसांचे एक पथक तिच्या घरी गेले असता घराला कुलूप आढळले.