गर्भपात कांड : डॉक्टर, एजंटांना चॅटिंग ॲपद्वारे पाठवलेले रिपोर्टस् पोलिसांच्या हाती

By सुमित डोळे | Published: May 22, 2024 01:32 PM2024-05-22T13:32:53+5:302024-05-22T13:35:30+5:30

भोकरदनमधील जालना रस्ता व आसपासच्या परिसरातील राजकीय वरदहस्ताचा दावा करणारे डॉक्टर अवैध गर्भपात करून देण्यासाठी आसपासच्या गावांत प्रसिध्द आहेत.

Abortion Scandal: Reports sent to doctors, agents through chatting apps in hands of police | गर्भपात कांड : डॉक्टर, एजंटांना चॅटिंग ॲपद्वारे पाठवलेले रिपोर्टस् पोलिसांच्या हाती

गर्भपात कांड : डॉक्टर, एजंटांना चॅटिंग ॲपद्वारे पाठवलेले रिपोर्टस् पोलिसांच्या हाती

छत्रपती संभाजीनगर / भोकरदन : जिल्ह्यासह जालना जिल्ह्यातील गर्भपाताच्या रॅकेटमधील मुख्य सूत्रधार महिलेच्या गर्भधारणेच्या कालावधीनुसार जबाबदारी ठरवून घेत होते, असे तपासात निष्पन्न झाले.

महिलेला गर्भपातासाठी कोणाकडे पाठवायचे, औषधांवरच गर्भपात करायचा की शस्त्रक्रियेद्वारे करायचा, हेदेखील हीच टोळी ठरवत होती. रॅकेटमध्ये सहभागी डॉक्टर, एजंट, सविता व साक्षी थोरात या माय-लेकी विविध चॅटिंग ॲपद्वारे रुग्णांचे मेडिकल रिपोर्ट शेअर करत होते. पोलिसांच्या हाती असे अनेक अहवाल लागले. मात्र, त्यातील पसार डॉक्टर व एजंटचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

सोमवारी न्यायालयाने आरोपींना २४ मेपर्यंत पाेलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. मंगळवारी पुंडलिकनगर पोलिसांनी मुख्य आरोपी व एजंटची पाच तास कसून चौकशी केली. सविता, साक्षीसह डॉ. ढाकरे सातत्याने वेगळी उत्तरे देऊन तपासात अडथळे आणत आहेत. दुसरीकडे भोकरदन तालुक्यातील चोरमारेवाडीत अलिशान रुग्णालय उभारलेल्या बोगस डॉक्टर बालाजी तळेकरच्या शोधासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्याच्यासह त्याच्या कुटुंबातील सदस्यांचे मोबाइल बंद असल्याने त्याचा विविध तांत्रिक पातळीवर शोध सुरू आहे.

रक्त, रक्तदाबाच्या रिपोर्टसह सोनोग्राफी रिपोर्टस्
साक्षी, सविताने जिल्हाभरात मागणीनुसार जाण्यासाठी स्वतंत्र कार घेतली हाेती. त्यावर पगारी चालकदेखील होता. त्या महिलांच्या गर्भचाचण्या करत होत्या, तर गर्भलिंगनिदान, सोनोग्राफीसह ब्लड, रक्तदाब व अन्य महत्त्वाच्या चाचण्यांसाठी लॅब ठरलेल्या होत्या. यासाठी त्यांना रेडिओलॉजिस्ट डॉ. सतीश सोनवणेने प्रशिक्षण दिले होते. गर्भपात निश्चित होताच हे सर्व रिपोर्टस् या सर्व आरोपींमध्ये शेअर होत होते. पोलिसांना हे पुरावे मिळाले आहेत. शिवाय, गर्भपाताच्या कालावधीनुसार ते महिला रुग्णाला कोणाकडे पाठवायचे, याचा निर्णय घेत असल्याचेही स्पष्ट झाले.

तळेकरचा साथीदार काकासाहेब खेकाळे (रा. पेजनापूर) हा औषधी दुकान चालवत होता. मात्र, त्याशिवाय तो शासकीय आरोग्य याेजनेप्रमाणे एक स्वत:ची रुग्णवाहिकादेखील चालवत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्याआधारे तो तालुक्यात सर्वत्र डॉक्टर असल्याची बतावणी करत होता. अत्यंत साधारण कुटुंबातून आलेल्या, सर्वसाधारण शिक्षण घेतलेल्या खेकाळेच्या आर्थिक परिस्थितीत काही वर्षांमध्ये अचानक सुधारणा झाली. उच्चभ्रू राहणीमान, महागडे कपडे, गाड्या, रोज किमान ३ हजारांचा सहज खर्च तो करायला लागला होता. यामुळे ग्रामस्थही अचंबित होत होते. हे रॅकेट उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांमध्ये खमंग चर्चा सुरू होती.

भोकरदनमधील जालना रस्ता व आसपासच्या परिसरातील राजकीय वरदहस्ताचा दावा करणारे डॉक्टर अवैध गर्भपात करून देण्यासाठी आसपासच्या गावांत प्रसिध्द आहेत. मात्र, आरोग्य विभागाकडून त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केले जाते. यातील काही डॉक्टरांकडे काम करणारे साधे कर्मचारी, कंपाउंडर अचानक श्रीमंत होऊन त्यांच्या राहणीमानात बदल झाल्याचेही ग्रामस्थ सांगतात.

Web Title: Abortion Scandal: Reports sent to doctors, agents through chatting apps in hands of police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.