सिडको बसस्थानक ते हर्सूल टी-पॉइंटपर्यंत सुमारे २०० अतिक्रमणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 06:20 PM2019-03-14T18:20:39+5:302019-03-14T18:21:27+5:30

अस्तित्वात असलेल्या सर्व्हिस रोडचा घोटलाय गळा

About 200 encroachments from cidco bus station to Harsul T-point | सिडको बसस्थानक ते हर्सूल टी-पॉइंटपर्यंत सुमारे २०० अतिक्रमणे

सिडको बसस्थानक ते हर्सूल टी-पॉइंटपर्यंत सुमारे २०० अतिक्रमणे

googlenewsNext
ठळक मुद्देसिडको बसस्थानकासमोर टपऱ्या, ‘काळीपिवळी’चे बस्तानजळगाव रस्त्यावर केवळ उजव्या बाजूने सर्व्हिस रोड 

औरंगाबाद : सिडको बसस्थानक ते हर्सूल टी-पॉइंट या जळगाव रस्त्यावर दोन्ही बाजूंनी हरित पट्टे (ग्रीन बेल्ट) आणि सर्व्हिस रोडवर सुमारे २०० अतिक्रमणे झाल्याचे ‘लोकमत’ने बुधवारी केलेल्या पाहणीत दिसून आले. अतिक्रमणधारकांनी थाटलेली दुकाने व वाहनतळांमुळे ग्रीन बेल्टचे नुकसान झाले असून, काही ठिकाणचा सर्व्हिस रस्ताच गिळून टाकला आहे.

बीड बायपासवर सतत प्राणान्तिक अपघात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी पुढाकार घेतल्याने तेथील अतिक्रमणांवर महापालिकेने थेट कारवाई सुरू केली. या कारवाईमुळे बायपाससाठी सर्व्हिस रस्त्याचा मार्ग मोकळा झाला. अशाच प्रकारचे अतिक्रमण शहरातील जळगाव रस्त्यावर हॉकर्स आणि मालमत्ताधारकांनी केले आहे. जळगाव टी-पॉइंट ते हर्सूल टी-पॉइंटदरम्यानच्या रस्त्यावर दोन्ही बाजंूनी अनधिकृत दुकाने थाटली आहेत. 

सिडको बसस्थानकासमोर टपऱ्या, ‘काळीपिवळी’चे बस्तान
सिडको बसस्थानकासमोरील ग्रीन बेल्टचे रूपांतर व्यापारीपेठेत केल्याचे दिसून येते. जळगाव टी-पॉइंट चौक ते सिडको एन-१ चौकादरम्यान खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या ४० टपऱ्या आहेत. शिवाय तेथे काळीपिवळी जीपचालक आणि अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीप, टेम्पो ट्रॅव्हलर आणि अन्य खाजगी वाहने मोठ्या संख्येने उभी असतात. या वाहनांमुळे तेथील संपूर्ण ग्रीन बेल्ट नष्ट झाला. विशेष म्हणजे या लोकांविरोधात महापालिकेच्या वतीने चार महिन्यांपूर्वी कारवाई करण्यात आली होती. या कारवाईचा कोणताही परिणाम अतिक्रमणधारकांवर झालेला नाही. 

ग्रीन बेल्टमध्ये गॅरेज, रसवंती
जळगाव रस्ता आणि सर्व्हिस रस्त्यादरम्यान असलेल्या ग्रीन बेल्टवर काही स्वयंसेवी संस्था आणि दुकानदार, हॉटेल्सचालकांनी झाडे लावून छोटी-छोटी उद्याने विकसित केली.   उर्वरित जागेवर अतिक्रमणे करून खाद्यपदार्थांची दुकाने, रसवंती आणि गॅरेजही थाटली आहेत. आंबेडकर चौक आणि सिडको स्टॅण्डलगतच्या दारू दुकानासमोरील ग्रीन बेल्टवर शेकडो मद्यपी तेथे बसून दारू पितात. 

जळगाव रस्त्यावर केवळ उजव्या बाजूने सर्व्हिस रोड 
संपूर्ण जळगाव रस्त्याच्या उजव्या बाजूने सर्व्हिस रोड आणि ग्रीन बेल्ट अस्तित्वात आहे, तर डाव्या लेनशेजारी सिडको बसस्थानक ते काळा गणपती मंदिरापर्यंत सर्व्हिस रोड आहे.  तेथून पुढे आंबेडकरनगरपर्यंत  एमआयडीसी एरिया असल्याने तेथे सर्व्हिस रोड आणि ग्रीन बेल्ट नाही. डाव्या बाजूने काही स्वयंसेवी संस्थांनी ग्रीन बेल्टमध्ये झाडे लावली असून, त्यांचे संगोपनही ते व्यवस्थित करीत आहेत.

Web Title: About 200 encroachments from cidco bus station to Harsul T-point

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.