शेतकऱ्यांसाठीचा पोक्रा १ प्रकल्प संपला, सुमारे साडेपाचशे कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड

By बापू सोळुंके | Published: July 20, 2024 11:34 AM2024-07-20T11:34:22+5:302024-07-20T11:35:26+5:30

पोक्रा योजना टप्पा १ सोबतच या योजनेतील सुमारे साडेपाचशे कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा नुकतीच संपुष्टात आणण्यात आली.

About 550 employees in POCRA Project 1 for farmers have been axed by unemployment | शेतकऱ्यांसाठीचा पोक्रा १ प्रकल्प संपला, सुमारे साडेपाचशे कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड

शेतकऱ्यांसाठीचा पोक्रा १ प्रकल्प संपला, सुमारे साडेपाचशे कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड

छत्रपती संभाजीनगर : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अर्थात पोक्रा योजनेच्या टप्पा १ समाप्त झाल्याने या योजनेत राज्यभर कार्यरत असलेल्या सुमारे ५५० कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. पोक्रा योजनेच्या टप्पा दोनला अद्याप मंजुरी मिळाली नाही. शिवाय टप्पा दोनसाठी बाह्यस्रोत एजन्सीकडून कर्मचाऱ्यांची भरती होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा टप्पा क्रमांक १ हा सन २०१८-१९ ते सन २०२३-२४ या पाच वर्षाच्या कालावधीत राबविण्यात आला. छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील १५ जिल्ह्यांचा समावेश होता. प्रत्येक जिल्ह्यातील मोजके तालुके आणि गावे यासाठी निवडण्यात आली होती. पोक्रा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक जिल्हा, उपविभाग आणि तालुकास्तरावर कंत्राटी कर्मचारी घेण्यात आले होते. पहिला टप्पा नुकताच समाप्त झाला. ३० जूनपर्यंत पोक्रामधील विविध योजना, लाभार्थी आणि त्यांना देण्यात आलेल्या अनुदान तसेच प्रत्येक योजनेची कितपत अंमलबजावणी झाली. लाभार्थी शेतकरी, शेतकरी गट यांनी घेतलेल्या योजनांचा ते वापर करीत आहेत का, याविषयी पडताळणी करण्यात आली होती. यात बोगसगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर त्यांनी शासनाचे जेवढे अनुदान घेतले, तेवढ्या रकमेचा बोझा चढविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. पोक्रा योजना टप्पा १ सोबतच या योजनेतील सुमारे साडेपाचशे कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा नुकतीच संपुष्टात आणण्यात आली. पोक्रा टप्पा दोनसाठी गावे निवडण्याचे काम राज्यस्तरीय समितीकडून केले जाणार आहे.

असाही प्रयत्न...
सूत्रांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीनंतरच पोक्रा २ची घोषणा होण्याची शक्यता आहे. टप्पा दोनसाठी पुन्हा बाह्यस्रोत एजन्सीकडून कंत्राटी कर्मचारी सेवेत घेतले जातील. यात टप्पा एकमधील कर्मचारी असतील असे नाही. यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांची सेवा संबंधित कंपनीने संपुष्टात आणली.

Web Title: About 550 employees in POCRA Project 1 for farmers have been axed by unemployment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.