करियर,नात्यांबद्दल डायरीत व्यक्त व्हायची; अचानक मित्राला व्हिडिओ कॉल करून संपवल जीवन
By सुमित डोळे | Published: April 3, 2024 12:10 PM2024-04-03T12:10:43+5:302024-04-03T12:11:18+5:30
उच्चशिक्षित तरुणीने मध्यरात्री मित्राला व्हिडिओ कॉल करून उचलले टोकाचे पाऊल
छत्रपती संभाजीनगर : करिअरबाबत अपूर्ण राहिलेले स्वप्न, नाती, मित्र-मैत्रिणी, अशा सर्व बाबींची रोजनिशी लिहिणाऱ्या उच्चशिक्षित तरुणीने धक्कादायकरीत्या आयुष्य संपवले. सोमवारी मध्यरात्री २ वाजता तिने मित्राला व्हिडीओ कॉल करून आत्महत्या करत असल्याचे सांगून गळफास घेतला.
सिद्धार्थी संतोष हरदे (२३) असे तिचे नाव आहे. घाबरलेल्या मित्राने घरी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत सिद्धार्थीने आयुष्य संपवले होते. मूळ कन्नड तालुक्यातील जावळी येथील असलेली सिद्धार्थी काही दिवसांपूर्वीच शहरात स्थायिक झाली होती. काही दिवस कन्नडच्या एका रुग्णालयात काम केल्यानंतर ती पैठण रोडवरील एका महाविद्यालयात लॅब असिस्टंट म्हणून रुजू झाली होती. महाविद्यालयापासून काही अंतरावर कांचनवाडीमध्ये किरायाने खोली घेऊन ती एकटी राहत होती. सोमवारी दिवसभर महाविद्यालयात वेळ घालवून ती खोलीवर परतली. सोमवारी अचानक तिने एका मित्राला कॉल केला. त्याच्याशी बराच वेळ बोलल्यानंतर तिने आयुष्य संपवत असल्याचे त्याला सांगितले. मित्र तिची समजून घालण्याचा प्रयत्न करत असतानाच सिद्धार्थीने लटकवून घेतले. मित्राने धाव घेत घरमालकाला उठवले. त्यानंतर त्यांनी दरवाजा तोडला असता सिद्धार्थी लटकलेल्या अवस्थेत दिसली. घटनेची माहिती कळताच उपनिरीक्षक अमोल सोनवणे, अंमलदार साईनाथ चव्हाण यांनी धाव घेतली. सिद्धार्थीला घाटी रुग्णालयात नेले. मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.
खोलीत रोजनिशी आढळली
पोलिसांना सिद्धार्थीच्या खोलीत डायरी आढळली. त्यात सिद्धार्थीने आयुष्याविषयी मजकूर लिहिलेला आढळला. स्पर्धा परीक्षेची तयारी, सरकारी अधिकारी होण्याच्या स्वप्नाविषयी लिहिले आहे. शिवाय एकटपेणा, आर्थिक परिस्थिती, तडजोड, अपूर्ण राहिलेले स्वप्न आदी मुद्द्यांवर तिने डायरीत लिहिले आहे. रविवारी ती लासूर येथे राहणाऱ्या मावशीकडे गेली होती. सोमवारी सकाळी तेथून शहरात परतली. या भेटीदरम्यान सिद्धार्थी आनंदी होती. मात्र, सोमवारी अचानक तिने टोकाचे पाऊल उचलले. तिचे आई-वडील शेतकरी असून, तिला एक लहान भाऊ आहे. पोलिसांनी तिची डायरी, मोबाइल जप्त केला. शिवाय, तिने नेमकी आत्महत्या का केली, याचा तपास सुरू असल्याचे सातारा पोलिसांनी सांगितले.