अबब...औरंगाबादमध्ये कम्पोस्टिंग पीट उभारणीस होणार ५ कोटींचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 03:38 PM2018-04-11T15:38:50+5:302018-04-11T15:42:28+5:30
महापालिकेने ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शहरात तब्बल ४३३ ठिकाणी कम्पोस्टिंग पीट तयार करण्याचे काम सुरू केले आहे. या कामावर ५ कोटी रुपये खर्च होणार आहेत.
औरंगाबाद : महापालिकेने ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शहरात तब्बल ४३३ ठिकाणी कम्पोस्टिंग पीट तयार करण्याचे काम सुरू केले आहे. या कामावर ५ कोटी रुपये खर्च होणार आहेत. एवढा पाण्यासारखा पैसा खर्च करून फक्त ७० ते ८० टन कचऱ्यावरच प्रक्रिया करण्यात येईल. शहरात दररोज किमान ३०० मेट्रिक टन कचरा जमा होतो. उर्वरित ओल्या कचऱ्याचे करणार काय? याचे उत्तर मनपाकडे नाही.
शहरातील कचरा प्रश्न महापालिकेच्या दृष्टीने पूर्णपणे संपला आहे. मध्यवर्ती बसस्थानकासमोर कचऱ्यावर केमिकल पद्धतीने प्रक्रिया करण्यात आली. आकाशवाणी येथेही कचरा उचलण्यात आला. पदमपुरा येथील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली. मध्यवर्ती जकात नाका येथे फक्त ३० टक्के कचरा आहे. औरंगपुऱ्यातील कचऱ्याचे डोंगरही आठ दिवसांत नष्ट करण्यात येणार असल्याचा दावा मनपा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. पूर्वीच्या तुलनेत आज कचरा जास्त नसल्याचा दावा मनपाचा आहे.
शहरातील कचरा कोंडी फोडण्यासाठी झोननिहाय कम्पोस्टिंग पीट तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मोठ्या पीटवर पत्र्याचे शेडही उभारण्यात येत आहे. कायमस्वरूपी हे पीट राहणार आहेत. ४३३ कम्पोस्टिंग पीटसाठी ४ कोटी ८७ लाख ५९ हजार ९१५ रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. या आकड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. एवढा अवाढव्य खर्च मनपा करीत असून, सर्व पीटवर ७० ते ८० टन ओल्या कचऱ्यावरच प्रक्रिया होणार आहे. शहरात ४०० ते ४५० मेट्रिक टन कचरा तयार होतो. त्यात ३०० मेट्रिक टन ओला कचरा असतो. २०० मेट्रिक टन ओल्या कचऱ्याचे काय करणार याचे उत्तर मनपा प्रशासनाकडे सध्या तरी नाही.
मशीन खरेदी ३ कोटीत
एकीकडे कम्पोस्टिंगसाठी मनपा ५ कोटी रुपये खर्च करीत आहे. झोननिहाय मशीन खरेदीसाठी ३ कोटी १६ लाख ८० हजार रुपयांची निविदा प्रसिद्व करण्यात आली आहे. मनपाच्या नऊ झोनमध्ये या मशीन बसविण्यात येतील. सर्व मशीनवर किमान ३० ते ४० टक्के कचऱ्यावर प्रक्रिया होईल, असा दावा मनपाचा आहे. चिकलठाण्यातील दुग्धनगरीच्या जागेवर केंद्रित प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
कम्पोस्टिंग पीटचा झोननिहाय खर्च
झोन प्रस्तावित पीट खर्च
झोन १ ५८ ४२ लाख ४७ हजार
झोन २ १५ १९ लाख ०६ हजार
झोन ३ ७९ ९० लाख ६२ हजार
झोन ४ ४१ ४३ लाख ७८ हजार
झोन ५ ०१ ३९ लाख ११ हजार
झोन ६ ४५ ९८ लाख ५५ हजार
झोन ७ ९८ ५३ लाख ५१ हजार
झोन ८ १८ ४९ लाख ४१ हजार
झोन ९ ७८ ५१ लाख ०३ हजार