मोक्काच्या गुन्ह्यातील फरार आरोपी सहा वर्षांनंतर लागला पोलिसांच्या हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 06:28 PM2021-03-16T18:28:56+5:302021-03-16T18:30:39+5:30
दशमेशनगर येथे घरात एकटे राहणाऱ्या मिश्रीलाल कन्हैयालाल बरडिया (८१) यांच्या घराच्या खिडकी तोडून १ लाख ५ हजार रुपये रोख आणि ५० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास केले होते.
औरंगाबाद : ज्योतीनगर परिसरातील दशमेशनगरात १४ ऑक्टोबर २०१५ रोजी लुटून फरार झालेल्या एका गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १२ मार्च रोजी अंबाजोगाई येथे सापळा रचून शिताफीने पकडले. या आरोपीसह त्याच्या साथीदारांवर पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाई केली होती. पांडुरंग उर्फ गजानन कचरे (रा. अंबाजोगाई, जि. बीड) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
आरोपी कचरे टोळीतील आरोपी सूर्यकांत श्रीराम मुळे (२८,रा. गांधीनगर, अंबाजोगाई), विनोद दिगंबर गायकवाड (रा. ज्योतीनगर ) , गोरखनाथ रघुनाथ खळेकर (२१) सुनील भाऊसाहेब पवार, नंदू पंढरीनाथ सिरसाट, राजेंद्र श्रीराम कळसे यांनी कट रचून १४ ऑक्टोबर २०१५ रोजी रात्री दशमेशनगर येथे घरात एकटे राहणाऱ्या मिश्रीलाल कन्हैयालाल बरडिया (८१) यांच्या घराच्या खिडकी तोडून १ लाख ५ हजार रुपये रोख आणि ५० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. या गुन्ह्यात चार आरोपी प्रत्यक्ष सहभागी झाले होते. याप्रकरणी उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा केल्यापासून आरोपी पांडुरंग उर्फ गजानन फरार झाला होता. त्याचे साथीदारांना पोलिसांनी अटक केली होती.
दरम्यान, १२ मार्च रोजी तो त्याच्या गावी आल्याची माहिती खबऱ्याने पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांना मिळाली. फौजदार योगेश धोंडे, सहायक फौजदार नंदकुमार भंडारे, हवालदार गणपत गरड, गजानन मांटे, भावसिंग चव्हाण, राहुल खरात, सुनील मोटे , नितीन देशमुख आणि चालक तातेराव सिनगारे यांच्या पथकाला लगेच अंबाजोगाईला रवाना केले. पथकाने सापळा रचून आरोपी पांडुरंग ऊर्फ गजानन हा रात्री अंबाजोगाई येथील त्याच्या घरातून बाहेर पडला आणि चौकात येताच पथकाने त्याला शिताफीने पकडले.
न्यायालयात हजर न होणाऱ्या आरोपीला अटक
याच गुन्ह्यातील आरोपी राजेंद्र कचरे हा अटक झाल्यानंतर न्यायालयाने त्याला सशर्त जामीन दिला होता. मात्र जेलमधून बाहेर पडल्यावर तो कोर्टात सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीसाठी हजर होत नव्हता. यामुळे न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट काढले होते. पोलिसांनी त्यालाही अटक करून न्यायालयांत हजर केल्याचे पोलिसांनी सांगितले.