जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी
By Admin | Published: November 10, 2014 11:48 PM2014-11-10T23:48:59+5:302014-11-10T23:58:30+5:30
उस्मानाबाद : उस्मानाबादसह कळंब, तुळजापूर, भूम तसेच वाशी तालुक्याच्या परिसरात सोमवारी दुपारी, सायंकाळी झालेल्या पावसामुळे रबीच्या पिकांना जीवदान मिळाले़
उस्मानाबाद : उस्मानाबादसह कळंब, तुळजापूर, भूम तसेच वाशी तालुक्याच्या परिसरात सोमवारी दुपारी, सायंकाळी झालेल्या पावसामुळे रबीच्या पिकांना जीवदान मिळाले़ काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने शेतकरी वर्गातही समाधान व्यक्त होत आहे़
यंदा सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाल्याने खरीप हंगामातील अपेक्षित उत्पन्न शेतकऱ्यांना मिळालेले नाही़ परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्याने रबीचा हंगाम धोक्यात आला असून, उपलब्ध पाण्यावर अनेकांनी रबीची पेरणी केली आहे़ मात्र, कमी प्रमाणात असलेली थंडी आणि जलस्त्रोतातील अपुरे पडत असलेले पाणी यामुळे रबी हंगामातील पिके धोक्यात आली आहेत़ ज्वारीसह तूर, हरभरा आदी पिकेही पाण्याअभावी कोमेजू लागली असून, रोगराईचाही प्रादुर्भाव झाला आहे़ त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना सोमवारी दुपारी झालेल्या पावसामुळे काही अंशी दिलासा मिळाला़
उस्मानाबाद शहरासह येडशी, बेंबळी, अंबेवाडी, रूईभर, देवळाली, शिंगोली वडगाव सह ढोकी गोवर्धनवाडी, तडवळा आदी भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला़ रात्री उशिरापर्यंत शहरासह परिसरात पावसाची हजेरी कायम होती़ कळंब शहरासह खामसवाडी, शिराढोण, येरमाळा, उपळा, रत्नापूर, पानगाव, चोराखळी, सापनाई आदी परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला़ गंभीरवाडी शिवारात मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या़ तर शिराढोण, घारगाव परिसरात दुपारी व सायंकाळीही पाऊस झाला़ शिवाय तुळजापूर शहरासह परिसरात तसेच तामलवाडी, सांगवी काटी, सुरतगाव, माळुंब्रा, धोतरी, पिंपळा बुद्रुक, पिंपळा खुर्द, सावरगाव, धोत्री आदी भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला़ वाशी शहर व परिसरातही पावसाने हजेरी लावली़ परंडा, उमरगा, लोहारा या तालुक्यातील काही भागात काही वेळ रिमझिम पाऊस झाला़ तर शहरासह परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते़ एकूणच उस्मानाबाद, तुळजापूर, कळंब व वाशी परिसरात झालेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे रबी हंगामातील ज्वारी, तूर, हरभरा आदी पिकांना जीवदान मिळाले असून, शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे़ मात्र, पिकांचे चांगले उत्पन्न मिळण्यासाठी मोठ्या पावसाची आजही शेतकऱ्यांना प्रतिक्षा कायम आहे़
दरम्यान, कळंब तालुक्यातील ईटकूर, आंधोरा परिसरातही रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. अन्य भागातही आकाशात ढग तसेच विजांचा कडकडाट सुरू होते. भूम शहरातही किरकोळ पावसाच्या सरी
कोसळल्या. (प्रतिनिधी)