जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाची हजेरी

By Admin | Published: August 30, 2014 11:40 PM2014-08-30T23:40:09+5:302014-09-01T00:27:34+5:30

परभणी : शनिवारीे परभणी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला.

Absolute strong rain in the district | जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाची हजेरी

जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाची हजेरी

googlenewsNext

परभणी : शनिवारीे परभणी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असल्याने हा पाऊस पिकांसाठी पोषक मानला जात आहे. या पावसाळ्यात पहिल्यांदाच पावसाने जोर धरल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
मागील दोन महिन्यांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आॅगस्ट महिन्यातील शेवटचा आठवडा सुखकारक व आशादायक ठरला. या आठवड्यात सलग दोन-तीन दिवस पाऊस झाला आहे़ त्यामुळे जिल्ह्याच्या सरासरीमध्ये वाढ होत आहे़ शनिवारी शहरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते़ त्यामुळे दिवसभरात पावसाची शक्यता वर्तविली जात होती़ सकाळी ११ वाजेच्या सुमारास पावसाला प्रारंभ झाला़ १० ते १५ मिनिटे बऱ्यापैकी पाऊस झाला़ त्यानंतर अधूनमधून पावसाची रिमझिम सुरू होती़ दुपारी १ वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला़ अर्धा ते पाऊण तास हा पाऊस होता़ त्यानंतरही शहर व परिसरात रिमझिम पाऊस सुरूच राहिला़ रात्री ८ वाजेच्या सुमारास मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू होता़ या पावसाळ्यातील हा पहिलाच दमदार पाऊस आहे़ पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते़ चाकरमान्यांची पावसाने धावपळ उडाली़
वाघाळ्यात जोरदार पाऊस
मागील दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या पावसाने ३० आॅगस्ट रोजी दीड तास धुँवाधार वृष्टी केल्यामुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले होते़ या पावसामुळे वाघाळा परिसरातील ओढे आणि नाल्यांना पाणी आले़ शनिवारी गावात आठवडी बाजार असतो़ पावसामुळे व्यापाऱ्यांचे ओटे पाण्याखाली गेल्यामुळे तारांबळ उडाली़ महालक्ष्मी सणासाठी खरेदी करणाऱ्या ग्राहकांची बाजारात गर्दी झाली होती़ परंतु, गुडघाभर पाण्यात उभे राहूनच खरेदी करावी लागली़ गावाशेजारील ओढ्याला पूर आल्याने मुद्गल, सोनपेठ व पाथरीकडे जाणारी वाहतूक उशिरापर्यंत बंद होती़ बसस्थानक परिसर जलमय झाला होता़ जि़प़च्या शाळेलाही तळ्याचे स्वरुप आले होते़ प्राथमिक आरोग्य केंद्रासह त्या शेजारील घरकुलांमध्ये पाणी गेल्याने स्थानिक रहिवाशांचे अन्नधान्य व संसारोपयोगी साहित्य भिजले आहे़ वंजार वस्तीत काही घरांमध्ये ओढ्याचे पाणी शिरले होते़ शेतातही माती वाहून गेल्याने बांध फुटले आहेत़
मानवत तालुक्यातही शनिवारी जोरदार पावसाने हजेरी लावली़ दुपारपासूनच पावसाच्या सरी सुरू होत्या़ पंधरा-वीस मिनिटे मध्यमस्वरुपाचा पाऊस झाल्यानंतर परत रिमझिम आणि पुन्हा १५-२० मिनिटांनी पावसाचा जोर वाढत होता़ असा प्रकार दिवसभर सुरूच होता़
सेलू तालुक्यात सकाळपासून ढगाळ वातावरण होते़ दुपारी हलका पाऊस झाला तर सायंकाळी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे़ गंगाखेड तालुक्यात दुपारी १ तास मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला़ दिवसभर पावसाची रिमझिम सुरूच होती़ पाथरी तालुक्यातही शनिवारी जोरदार पावसाने हजेरी लावली़ दुपारी १२़३० ते १़३० या एक तासात जोरदार पाऊस झाला़ दिवसभर रिमझिम सुरू होती़ पालम तालुक्यातही दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली़ तब्बल दोन तास हा पाऊस बरसला़ दिवसभर पावसाची रिपरिप होती़
जिल्ह्यात २२५ मिमी पाऊस
जिल्ह्यात शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी २२५़६२ मिमी पाऊस झाला आहे़ परभणी तालुक्यात २०७़ २४, पालम १६४, पूर्णा २०३़९, गंगाखेड २१५़२५, सोनपेठ २५९, सेलू २१७़७६, पाथरी २५९, जिंतूर २६०़१३ आणि मानवत तालुक्यात २४५़४३ मिमी पाऊस झाला आहे़
पूर्णा शहर व परिसरात ३० आॅगस्ट रोजी सकाळपासून संततधार पाऊस व झड सुरू आहे. या ठिकाणी ५० मि.मी. पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली़ (प्रतिनिधी)
पाणीसाठ्यात अल्पशी वाढ, येलदरीत ४१ टक्के जलसाठा
जिल्ह्यामध्ये जिंतूर तालुक्यातील येलदरी आणि सेलू तालुक्यातील निम्न दुधना हे मोठे प्रकल्प आहेत़ या दोन्ही प्रकल्पांमध्ये पाणीसाठ्यात अल्पशी वाढ झाली आहे़ येलदरी धरणात ४१ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला असून, निम्न दुधना प्रकल्पामध्ये देखील ५५ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे़
शनिवारी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ओढे -नाले पहिल्यांदाच वाहू लागले़ छोट्या मोठ्या नाल्यांना पाणी आले आहे़ या पावसामुळे पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होईल़
पाथरी तालुक्यातील वाघाळा येथे शनिवारी दीड तास जोरदार पाऊस झाला

Web Title: Absolute strong rain in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.