संभाव्य तिसऱ्या लाटेत मनपाकडे मुबलक ऑक्सिजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:04 AM2021-09-21T04:04:07+5:302021-09-21T04:04:07+5:30
औरंगाबाद : चिकलठाणा येथील मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमध्ये लिक्विड ऑक्सिजन प्लांटच्या उभारणीस वेग आला आहे. पदमपुरा कोविड सेंटर, गरवारे ...
औरंगाबाद : चिकलठाणा येथील मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमध्ये लिक्विड ऑक्सिजन प्लांटच्या उभारणीस वेग आला आहे. पदमपुरा कोविड सेंटर, गरवारे कंपनीतर्फे उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्येही ऑक्सिजन प्लांटची व्यवस्था केली जाणार आहे. सप्टेंबरअखेरपर्यंत पाच ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.
कोरोनाची तिसऱ्या लाटेपूर्वी तयारी करण्याचे आदेश राज्य शासनाने महापालिकेला दिले होते. मागील काही दिवसांपासून मनपाकडून तयारी सुरू आहे. आरोग्य विभागाने मुबलक प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध व्हावा, या दृष्टीने प्रयत्न सुरू केले असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.
मेल्ट्रॉनच्या रुग्णालयात २० किलोलीटरचा ऑक्सिजन प्लांट उभारणीचे काम सुरु आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नातून २५० लिटर प्रतिमिनिट या क्षमतेचा प्लांटदेखील उभारण्यात आला आहे. सीएसआर फंडातून या प्लांटची उभारणी केली आहे. ॲराॅक्स कंपनीचा ऑक्सिजन प्लांटदेखील पूर्णत्वास आला आहे. या प्लांटची क्षमता ८९० लिटर ऑक्सिजन प्रतिमिनिट उत्पादन करण्याची आहे.
पदमपुरा कोविड केअर सेंटरसाठी ५०० लिटर प्रतिमिनिट उत्पादनक्षमतेचा ऑक्सिजन प्लांट उभारला जाणार आहे. सीएसआर फंडातून हा प्लांट उभारला जाईल. गरवारे कंपनीतर्फे बालकांसाठी कोविड केअर सेंटर उभारण्यात आले. या कोविड केअर सेंटरसाठी ५९० लिटर प्रतिमिनिट उत्पादनक्षमतेचा ऑक्सिजन निर्मितीचा प्लांट उभारला जात आहे. या सर्व प्लांटच्या माध्यमातून पावणे सहाशे खाटांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे.