कोरोना काळात सोशल मीडियावर बनावट अकाऊंट तयार करून गैरवापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:02 AM2021-07-07T04:02:26+5:302021-07-07T04:02:26+5:30
औरंगाबाद : पैसे उकळण्यासाठी अथवा एखाद्याला त्रास देण्यासाठी काही जण फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या समाजमाध्यमांचा वापर करीत आहेत. कोरोना कालावधीत ...
औरंगाबाद : पैसे उकळण्यासाठी अथवा एखाद्याला त्रास देण्यासाठी काही जण फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या समाजमाध्यमांचा वापर करीत आहेत. कोरोना कालावधीत फेसबुकवर बनावट प्रोफाईल तयार करण्यात आल्याच्या तक्रारी दुपटीने वाढल्याचे समोर आले. याविषयी तक्रार प्राप्त होताच सायबर पोलीस ठाण्याकडून अवघ्या काही तासांत फेक अकाऊंट बंद करण्याविषयी संबंधित कंपनीला कळविले जाते. स्मार्ट फोनमध्ये इंटरनेटची सुविधा उपलब्ध असते. परिणामी स्मार्ट फोन वापरणाऱ्या ९०टक्के नागरिकांपैकी कुणाचेना कुणाचे फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्रामसारख्या समाजमाध्यमांवर अकाऊंट असतेच. फेसबुकसह काेणत्याही समाजमाध्यमांवर अनोळखी व्यक्तींसोबत मैत्री करू नका, असे आवाहन पोलीस आणि सायबर तज्ज्ञ वारंवार करतात. मात्र मित्र, मैत्रिणींची संख्या वाढविण्यासाठी अनेक जण आलेली प्रत्येक फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारतात. सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असलेल्या व्यक्तींचे बनावट अकाऊंट तयार करून त्यांच्याच मित्रांना मित्र होण्यासाठी रिक्वेस्ट पाठवून मेसेंजरच्या माध्यमातून चॅटींग करून पैशाची मागणी करण्याच्या तक्रारी वाढल्या. शिवाय दुसऱ्याचे चारित्र्यहनन करण्यासाठी अशा बनावट अकाऊंटचा वापर केला जातो, अशा तक्रारी गेल्या काही वर्षांपासून सायबर पोलिसांकडे वाढल्या आहेत. औरंगाबाद सायबर पोलीस ठाण्याला २०१९ साली ३६३ अर्ज प्राप्त झाले. २०२० साली ५५९ तर यावर्षी आतापर्यंत ६२ तक्रारी आल्याचे सूत्रांनी सांगितले. सायबर पोलिसांकडे तक्रार प्राप्त होताच अधिकारी, कर्मचारी संबंधित तक्रारीचे स्वरुप पाहून तातडीने कारवाई करतात. बनावट अकाऊंट तयार केले असेल तर तक्रारदार अथवा त्याचे मित्र फेसबुकला याविषयी रिपोर्ट करू शकतो. अशा फेक अकाऊंटचा रिपोर्ट प्राप्त होताच फेसबुक अकाऊंट बंद करते.
-----------------------------
चौकट
समाजमाध्यमांविषयी सायबर पोलीस ठाण्याला प्राप्त अर्ज
सन २०१९ - ३६३
सन २०२० - ५५९
जून २०२१ पर्यंत- ६२
--------------------------------------------------------------
बनावट प्रोफाईल आढळल्यास काय करावे,
- फेसबुकवर वापरकर्त्याला त्याची बनावट प्रोफाइल आढळल्यास त्या प्रोफाइलवर उजव्या बाजूला तीन डॉट दिसतील, त्या डॉट वर क्लीक करा.
- तुमच्यासमोर फाईंड सपोर्ट अथवा रिपोर्ट प्रोफाईल हे ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.
:- प्रिटेंडींग टू बी समवन हा पहिला ऑप्शन दिसेल, त्यावर क्लीक करा. पुढे तुम्हाला मी, ए फ्रेंड आणि सेलिब्रेटी हे पर्याय दिसतील. स्वत:ची प्रोफाईल असेल तर मी हा ऑप्शन निवडा आणि नेक्स्ट करा, तुमची बनावट प्रोफाइल काही तासांत बंद होईल.
--------------------------------
कोरोना काळात वाढल्या तक्रारी
कोरोना काळात कामधंदा बंद असल्यामुळे नागरिक घरीच होते. मोबाईल अथवा संगणकावर सोशल मीडियावर सक्रिय होते. गतवर्षी २०२० साली औरंगाबाद शहर सायबर पोलिसांना ५५९ तक्रारी सोशल मीडियाविषयी प्राप्त झाल्या होत्या. यावर्षीही अशा तक्रारींचा ओघ सुरूच असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
----------------------------------------------------
कोट
काही तासांत बनावट अकाऊंट बंद
एखाद्या वापरकर्त्यास अथवा त्यांच्या मित्राला बनावट अकाऊंट नजरेस पडल्यास ते तातडीने त्या बनावट अकाऊंटविषयी फेसबुकला रिपोर्ट करावा. यानंतर फेसबुककडून ते बनावट अकाऊंट तातडीने बंद करण्याची कार्यवाही केली जाते. यामुळे शिवाय काही प्रोफाईलचा वापर गुन्हा करण्यासाठी झाल्यास हे प्रोफाईल तयार करणार्याचा शोध घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा नोंदविला जातो.
- गीता बागवडे, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे,