"संविधानातील तरतुदींचा उच्च शिक्षणात दुरुपयोग"; सर्व विद्यापीठांवर प्राध्यापक काढणार मोर्चा

By राम शिनगारे | Published: July 24, 2024 12:14 PM2024-07-24T12:14:04+5:302024-07-24T12:16:55+5:30

बामुक्टो संघटनेचा राज्याच्या उच्च शिक्षण खात्यावर हल्लाबोल, १६ ऑगस्ट रोजी काढणार महामोर्चा

"Abuse of Constitutional Provisions in Higher Education"; Professors will march on all universities | "संविधानातील तरतुदींचा उच्च शिक्षणात दुरुपयोग"; सर्व विद्यापीठांवर प्राध्यापक काढणार मोर्चा

"संविधानातील तरतुदींचा उच्च शिक्षणात दुरुपयोग"; सर्व विद्यापीठांवर प्राध्यापक काढणार मोर्चा

छत्रपती संभाजीनगर : राज्याच्या उच्च शिक्षण खात्याकडून संविधानातील तरतुदींचा गैरवापर होत असल्याचा आरोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेने (बामुक्टो) केला आहे. शिक्षण खात्याच्या या कृत्याविरोधात येत्या १६ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व विद्यापीठांवर प्राध्यापकांचा महामोर्चा काढण्यात येणार असल्याचे बामुक्टोतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

बामुक्टोचे विभागीय अध्यक्ष डॉ. बप्पासाहेब म्हस्के, विभागीय सचिव डॉ. मारोती तेगमपुरे, अधिसभा सदस्य डॉ. उमाकांत राठोड आणि डॉ. डी.आर.देशमुख यांनी संघटनेची भूमिका समर्थनगर येथील गांधी भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मंगळवारी मांडली. 

भारतीय संविधानातील कलम २५४ मध्ये कोणताही बदल झालेला नसताना घरगुती पद्धतीने त्यामध्ये बदल करुन त्या कलमाचा वापर उच्च शिक्षण विभागाने केला आहे. त्यांचा हा बेकायदेशीर उद्योग निरंतर सुरू आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या रेग्युलेशनशी विसंगत राज्य शासनाचा कायदा किंवा निर्णय अस्तित्वात राहू शकत नाही. मात्र, उच्च शिक्षण विभागातील अधिकारी मात्र सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मानायला तयार नाहीत. युजीसीच्या रेग्युलेशनमध्ये विद्यापीठातील व महाविद्यालयातील कंत्राटी भरती व कायमस्वरुपी भरतीबाबत काटेकोर नियम ठरवून दिलेले आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याचा दावाही बामुक्टोच्या पदाधिकाऱ्यांनी केला. 

याशिवाय बामुक्टोच्या इतरही काही मागण्या आहेत. त्याविरोधात बामुक्टोने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. त्यानुसार १४ ऑगस्टपर्यंत जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर १६ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व विद्यापीठांवर महामोर्चा काढण्यात येणार आहे. त्यात प्राध्यापकांसह विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्रातील मंडळी सहभागी होणार असल्याचेही डॉ. म्हस्के, डॉ. तेगमपुरे यांनी सांगितले.

Web Title: "Abuse of Constitutional Provisions in Higher Education"; Professors will march on all universities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.