वाहतूक पोलिसाला शिविगाळ करीत स्वतःच्या डोक्यात मारून घेतला दगड
By राम शिनगारे | Published: March 28, 2023 07:18 PM2023-03-28T19:18:02+5:302023-03-28T19:18:22+5:30
सिडको बसस्थानक परिसरातील घटना : दुचाकी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर : दुचाकी चालकाने सिग्नल तोडल्यानंतर वाहतूक शाखा पोलीस कर्मचाऱ्याने त्याला आडवले. त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत असतानाच त्या चालकाने पोलिस कर्मचाऱ्यास शिविगाळ करीत स्वत:च्या डोक्यात दगड मारून घेतल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी सिडको बसस्थानक परिसरात घडला. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात दुचाकीचालकाच्या विरोधात शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला.
सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी रंजन उपाध्याय (रा. एन-२,सिडको ) असे आरोपीचे नाव आहे. सिडको वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी जालिंदर पंढरीनाथ गोरे हे २७ मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास सिडको बसस्थानक परिसरात कर्तव्य बजावत होते. त्यावेळी दुचाकी (एमएच २० बीझेड १६२७) चालकांने जोरात हॉर्न वाजवत सिग्नल तोडला. तेव्हा पोलिस कर्मचारी गोरे यांनी त्याला अडवून जोराने हॉर्न का वाजवतो असे विचारले.
तेव्हा त्याने पोलिस कर्मचाऱ्यास शिविगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच माझ्यावर दंडात्मक कारवाई कसे करता, असे म्हणून पोलिसांस धक्काबुक्की केली. त्यानंतर जवळच पडलेला दगड उचलून स्वत:च्या डोक्यात मारून घेतला. तसेच मी माझ्या जिवाचे बरे वाईट करून घेईल, अशी धमकीही दिली. माझ्यावर कारवाईच करायची नाही, अशी मागणीही आरोपीने केली. या प्रकरणी पोलिस कर्मचारी गोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला. अधिक तपास सहायक निरीक्षक बनसोडे करीत आहेत.