कॅब-एनआरसीवरून विद्यापीठात एबीव्हीपी आणि आंबेडकरी कार्यकर्ते भिडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 04:44 PM2019-12-19T16:44:25+5:302019-12-19T16:47:04+5:30
दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी समोरसमोर येऊन जोरदार घोषणाबाजी सुरु केली.यामुळे विद्यापीठात काही काळ तणाव होता.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कॅब-एनआरसीच्या समर्थनार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ( एबीव्हीपी ) गुरुवारी दुपारी मोर्चा काढला होता. मात्र मोर्चास परवानगी नसल्याने आणि या कायद्यावरून दिल्लीतील जामिया विद्यापीठात झालेल्या विद्यार्थि अत्याचारामुळे विद्यापीठातील आंबेडकरी कार्यकर्त्यांनी मोर्चाला विरोध केला. यावरून दोन्हीकडील कार्यकर्ते आक्रमक झाले. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी समोरसमोर येऊन जोरदार घोषणाबाजी सुरु केली.यामुळे विद्यापीठात काही काळ तणाव होता.
मागील तीन दिवसांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विविध आंबेडकरी संघटनांनी एकत्र येत कॅब-एनआरसीवरून जामिया विद्यापीठात झालेल्या अत्याचाराचा निषेध केला. सोमवारी सर्व संघटनांनी एकत्र येत विद्यापीठ बंदची हाक दिली. बुधवारी शहरात शैक्षणिक बंद पुकारण्यात आला होता. मात्र पोलिसांनी या बंदला परवानगी नाकारली होती. यानंतरही शहरात उत्स्फुर्तपणे शैक्षणिक बंद पाळण्यात आला. या दरम्यान, आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी कॅब-एनआरसीच्या समर्थनार्थ विद्यापीठात मोर्चा काढला. मात्र, या कायद्याला विरोध असल्याने दिल्लीतील जामिया विद्यापीठात विद्यार्थ्यांवर अत्याचार करण्यात आले तसेच मोर्चास परवानगी नसल्याचा मुद्दा उपस्थित करत सर्व आंबेडकरी संघटनांनी एकत्र येत मोर्चाला विरोध केला. दोन्हीकडील कार्यकर्त्यांनी आक्रमक होत जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे विद्यापीठात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. यानंतर विद्यापीठात दंगा काबू पथक दाखल झाले. पोलिसांच्या हस्तक्षेपाने काही वेळाने तणाव निवळला.