विद्यापीठात येत्या तीन महिन्यांत लावणार प्रशासकीय शिस्त : कुलगुरू येवले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 07:24 PM2019-07-26T19:24:55+5:302019-07-26T19:28:28+5:30

संघटनांचा हस्तक्षेप झुगारणार

academic discipline will be in coming three months : VC Yewale | विद्यापीठात येत्या तीन महिन्यांत लावणार प्रशासकीय शिस्त : कुलगुरू येवले 

विद्यापीठात येत्या तीन महिन्यांत लावणार प्रशासकीय शिस्त : कुलगुरू येवले 

googlenewsNext
ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू देणार नाहीप्रशासकीय पदे दोन महिन्यांत भरणार

औरंगाबाद : उत्तम दर्जाच्या पायाभूत सेवा-सुविधा, उत्कृष्ट परिसर, विद्यार्थ्यांचा लक्षणीय प्रतिसाद असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रशासकीय शिस्त आणि नियोजनाचा अभाव दहा दिवसांत आढळून आला. येत्या तीन महिन्यांत प्रशासकीय घडी पूर्णपणे बसविण्यात येईल. त्याच वेळी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी कोणालाही खेळू देणार नाही. लोकशाहीत चांगल्या कामासाठी संघटना योग्य असतात, मात्र त्यांचा प्रशासकीय कामात हस्तक्षेप सहन करणार नाही,  असा निर्धार नवनियुक्त कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर डॉ. प्रमोद येवले यांनी गुुरुवारी (दि.१५) पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. यावेळी डॉ. येवले म्हणाले, मागील दहा दिवसांमध्ये विद्यापीठाच्या विविध विभागांचा आढावा घेतला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांशी दोन वेळा संवाद साधला. तेव्हा त्यामध्ये अनेक चुका असल्याचे आढळून आले. मागील वर्षीपासून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका, पदवी कागद नसल्यामुळे मिळालेली नाही. त्यासाठी खरेदी समितीची बैठक घेतली. २०१८ यावर्षीचा दीक्षांत सोहळा झालेला नाही. तो आॅगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत घेण्यात येईल. त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. तसेच २०१९ चा दीक्षांत सोहळा नोव्हेंबर/ डिसेंबर महिन्यात घेतला जाईल. विद्यापीठात प्राध्यापकांच्या ११७ जागा रिक्त आहेत. त्यामुळे तासिका तत्त्वावर प्राध्यापक नेमण्यासाठीचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी येत्या दोन दिवसांत नियमानुसार जाहिरात देण्यात येईल. तासिका तत्त्वावरील नेमणुका केंद्रीय पद्धतीने केल्या जातील. पदव्युत्तर प्रवेशासाठी आगामी वर्षांपासून सीईटी बंद केली जाईल. पदवीच्या गुणांवर प्रवेश दिले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कुलसचिव डॉ. साधना पांडे, वित्त व लेखाधिकारी राजेंद्र मडके, परीक्षा संचालक डॉ. गणेश मंझा, विद्यार्थी संचालक डॉ. मुस्तजिब खान उपस्थित होते.

विश्वासाचे वातावरण निर्माण करावे लागेल
विद्यापीठातील अधिकार, विभागप्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमध्ये विश्वासाचे वातावरण तयार करण्याचे प्रमुख आव्हान आहे. विद्यार्थी केंद्रित कारभार, प्रशासनात गतिमानता व पारदर्शकता आणि कायद्याच्या चौकटीत काम करण्यास सर्वाधिक प्राधान्य असणार आहे. विद्यापीठात टीम वर्कचा अभाव आहे. टीम वर्क निर्माण करण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव विद्यापीठाला आहे. त्यामुळे विद्यापीठाची प्रतिमा कोणत्याही परिस्थितीत मलिन होऊ दिली जाणार नाही, असेही डॉ. येवले यांनी स्पष्ट केले. यासाठी मराठवाड्यातील विविध घटकांचे सहकार्य मिळावे, ही अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

प्रशासकीय पदे दोन महिन्यांत भरणार
विद्यापीठात सर्वच प्रशासकीय पदे रिक्त आहेत. ही पदे नियमानुसार जाहिरात देऊन येत्या दोन महिन्यांत भरण्यात येतील. यात कुलसचिव, परीक्षा संचालक, चार अधिष्ठाता, क्रीडा संचालक, विद्यार्थी विकास मंडळ संचालक आदींचा समावेश आहे. ही पदे भरण्यात आचारसंहिता आडवी येण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला जाईल. निवडणूक आयोगाकडून जाहिरात देण्यासाठी परवानगी घेण्यात येईल, असेही डॉ. येवले यांनी सांगितले.

Web Title: academic discipline will be in coming three months : VC Yewale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.