एसीबीचा धमाका; छत्रपती संभाजीनगरमध्ये सलग तीन दिवस ‘ट्रॅप’, पोलीस, तलाठी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 12:17 PM2023-03-10T12:17:54+5:302023-03-10T12:18:35+5:30
एसीबीच्या धडक कारवाया, फेरफारसाठी कुठे २०, तर कुठे ३० हजार घेताना पकडले
छत्रपती संभाजीनगर : वडिलोपार्जित जमिनीचा भावांच्या नावावर फेरफार नोंदविण्यासाठी महिला तलाठ्याने ३० हजार रुपये मागितले, तर दुसऱ्या घटनेत पडेगावातील एका खाजगी व्यक्तीने प्लॉट नोंदीच्या फेरफारासाठी २० हजार रुपये घेतले. या दोन्ही घटनांमध्ये तलाठी, कोतवालासह एका खाजगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पैसे घेताना रंगेहाथ पकडले.
पहिल्या घटनेत कन्नड तालुक्यातील भारंबा सज्जाचे तलाठी दीपाली योगेश बागूल, पिशोरचा कोतवाल शेख हारुण शेख छोटू यांनी भारंबा शिवारातील वडिलोपार्जित जमीन दोघांच्या भावांच्या नावे फेरफार नोंदविण्यासाठी ३० हजार रुपये लाचेची मागणी केली. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे तक्रारदाराने जालना एसीबीच्या पथकाकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार निरीक्षक एस.एस. शेख यांच्या पथकाने भारंबा येथे बागूल आणि हारुण या दोघांना पकडले. याप्रकरणी पिशोर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला.
दुसरी घटना पडेगाव भागात घडली. अब्दुल अजीज खान अब्दुल कादीर खान हा खाजगी इसम मिटमिटा शिवारातील गट नं. १५८ मध्ये खरेदी केलेल्या प्लॉटचा तलाठी कार्यालयातून फेरफार करण्यासाठी २० हजार रुपयांची मागणी तक्रारदाराकडे करीत होता. तलाठ्याकडून हे काम करून देण्यासाठी पैसे लागतात, असेही त्याने सांगितले. तक्रारदारास पैसे देण्याची इच्छा नसल्यामुळे त्याने एसीबीकडे धाव घेतली. पथकाने सापळा रचून अब्दुल अजीज खान यास पकडले. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर अधीक्षक विशाल खांबे, उपाधीक्षक मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक रेश्मा सौदागर, अंमलदार रवींद्र काळे, भूषण देसाई यांच्या पथकाने केली. याप्रकरणी छावणी पाेलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला.
एसीबीचा धमाका, सलग तीन दिवस ‘ट्रॅप’
एसीबीच्या अधिकाऱ्यांनी कारवाईचा धमाकाच उडवून दिला आहे. सलग तीन दिवस सापळे यशस्वी केले. वाळूज एमआयडीसीतील सहायक पोलिस निरीक्षक, एमआयडीसी सिडकोतील दोन पोलिस कर्मचारी, जिल्हा परिषदेतील वेतन अधीक्षकाच्या नंतर तलाठी, कोतवाल आणि खाजगी व्यक्तीला लाच घेताना रंगेहाथ पकडले.