औरंगाबादेतील पाणीयोजना, ठाकरे स्मारकासह सर्व कामांना गती द्या; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 12:11 PM2022-11-19T12:11:13+5:302022-11-19T12:11:32+5:30
औरंगाबाद जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचा ऑनलाइन घेतला आढावा
औरंगाबाद : शहरासाठीची पाणीपुरवठा योजना, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक, पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचे पुनरुज्जीवन यांसह जिल्ह्यातील महत्त्वाची विकास कामे, प्रकल्पांना गती देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी दिले. पाणीपुरवठा योजनेसह या सर्व प्रकल्पांना निधी वेळेत उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या.
जिल्हा आणि पैठण मतदारसंघातील विविध विकास कामांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक झाली. बैठकीला जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.
सह्याद्री अतिथीगृहातील या बैठकीस पालकमंत्री संदीपान भुमरे, आ. संजय शिरसाट, सहकार अतिरिक्त मुख्य सचिव अनुपकुमार, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार सिंघल, गृह विभागाचे प्रधान सचिव संजय सक्सेना, वित्त विभागाच्या सचिव ए. शैला, जलसंपदा विभागाचे सचिव विलास राजपूत, मनपा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पर्यटन तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे बैठकीत म्हणाले, ‘जायकवाडीच्या जलाशयातील उद्भव विहिरीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरावे. ठाकरे स्मारक व स्मृती वनाचे काम गतीने करावे. पुतळ्याचे अंतिम आरेखन निश्चित करावे. नागरिकांकडून शिवसेनाप्रमुखांविषयीच्या आठवणी, माहिती मागविण्यात यावी. पैठण येथील ज्ञानेश्वर उद्यानाचे पुनरुज्जीवन होईपर्यंत ते तात्पुरत्या स्वरूपात नागरिकांसाठी पुन्हा खुले व्हावे.’औरंगाबाद विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादनास लागणारा अंदाजित निधी, तसेच नूतन जिल्हाधिकारी कार्यालय आणि पैठण येथील संत एकनाथ महाराज संतपीठ, घृष्णेश्वर मंदिर विकास आराखडा याची माहिती जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी दिली.
पोलिसांसाठी निवासस्थानांचा आराखडा तयार करा
पैठण येथे महावितरणचे विभागीय कार्यालय, बिडकीन नवीन उपविभागांची निर्मिती, विहामांडवा येथे १३२ केव्ही उपकेंद्र निर्माण करणे, औरंगपूरवाडी, दरकवाडी, रहाटगाव व केकत जळगाव येथील उपकेंद्रांची उभारणी, पोलिस आयुक्तालयासाठी; तसेच क्रांती चौक येथे ७८० निवासस्थाने, पोलिस अधीक्षक कार्यालयांतर्गत ४०५ निवासस्थाने बांधणे, विहामांडवा येथे नवीन पोलिस ठाणे बांधण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. यासाठी पोलिस गृहनिर्माण मंडळाला तातडीने आराखडे तयार करण्याचे; तसेच त्याबाबतचे प्रस्ताव सादर करून कामांना गती देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.
‘कारखाना प्रकरणात सुनावणी घ्या’
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांविषयी साखर आय़ुक्त, कामगार आयुक्तांनी कारखान्याचे जुने व आताचे खासगी व्यवस्थापन; तसेच कामगार या तिन्ही घटकांशी चर्चा करावी. यासंदर्भात आवश्यकता भासल्यास सुनावणी घेण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.