वाळूज महानगरात राजकीय हालचालींना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:02 AM2020-12-25T04:02:16+5:302020-12-25T04:02:16+5:30
वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली असून, राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. ...
वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली असून, राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. यंदा पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने नामांकन अर्ज भरताना उमेदवारांची दमछाक होत आहे.
ग्रामीण भागातील महत्त्वाचे सत्ताकेंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींची सत्ता काबीज करण्यासाठी गावपातळीवर राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये चढाओढ सुरू आहे. वाळूज उद्योगनगरीतील रांजणगाव, जोगेश्वरी, वाळूज, वळदगाव, नारायणपूर, पाटोदा, पंढरपूर आदी श्रीमंत ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. शासनाने सरपंचपदाची आरक्षण सोडत रद्द करून निवडणुकीनंतर नव्याने आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. नवीन आरक्षण सोडतीत विद्यमान आरक्षण कायम राहणार की बदलणार, याची चिंता मातब्बर उमेदवारांना सतावत आहे. निवडणुकीनंतर वेगळेच आरक्षण निघाल्यास सरपंचपदावर पाणी फिरण्याची शक्यता असल्यामुळे प्रमुख दावेदार पॅनलचा खर्च करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे चित्र उद्योगनगरीत दिसते आहे. आजघडीला परिसरात रांजणगाव शेणपुंजी वगळता इतर ठिकाणी पॅनलऐवजी स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. पक्षीय भेदाभेदाला थारा न देता अनेक ठिकाणी वॉर्डावाॅर्डांत नवनवीन समीकरणे उदयाला येत असल्यामुळे मतदारांतही संभ्रमाचे वातावरण आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमुळे उद्योगनगरीत राजकीय हालचालींना वेग आला आहे.
ऑनलाइन नामांकन भरताना दमछाक
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ऑनलाइन पद्धतीने नामांकन अर्ज भरले जात आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करून नामांकन अर्ज भरण्यासाठी उमेदवार गर्दी करीत आहेत. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर पुन्हा संचिका दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असल्यामुळे वाळूज महानगर परिसरातील उमेदवारांची दमछाक होत आहे. नामांकन अर्ज भरण्यासाठी मोजकेच दिवस शिल्लक असल्यामुळे उमेदवारांची धांदल उडत आहे.
-----------------------------