मेडिकल हबची उभारणी वेगात; औरंगाबादहून वर्षभराने राज्यभरात होणार औषधीपुरवठा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 07:26 PM2022-06-09T19:26:27+5:302022-06-09T19:27:55+5:30
औषधी खरेदीनंतर संपूर्ण राज्यात वितरित करणे, हे या भांडाराच्या माध्यमातून होणार आहे.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद :औरंगाबादेतील करमाड येथे उभारण्यात येत असलेला मेडिकल हब म्हणजे राज्यस्तरीय औषधी भांडाराचे ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. याठिकाणी औषधी भांडारासह गेस्ट हाउस, प्रशिक्षण केंद्राचीही इमारत उभी राहिली आहे. विद्युतीकरणाचे काम पूर्ण होताच वर्षभराने औरंगाबादहून राज्यभर औषधीपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
आरोग्य विभागाने २०११ पासून ई-निविदा पद्धतीने औषधी साहित्य, सामुग्रीच्या मध्यवर्ती खरेदीप्रणालीचा अवलंब सुरू केला. त्याचाच एक भाग म्हणून राज्याच्या मध्यवर्ती भागात राज्यस्तरीय औषधी भांडार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी विविध शहरांचे, गावांचे सर्वेक्षण करण्यात आले. अखेर औरंगाबादेतील करमाड येथे औषधी भांडार उभारण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. राज्यभरात सध्या ‘हाफकिन’कडून औषधी खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे करमाड येथे उभारण्यात येणारे राज्यस्तरीय औषध भांडार गुंडाळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती; परंतु या औषधी भांडाराची नियोजनाप्रमाणे उभारणी होणार आहे. औषधी खरेदीनंतर संपूर्ण राज्यात वितरित करणे, हे या भांडाराच्या माध्यमातून होणार आहे. २०२१ मध्ये बांधकामाला सुरुवात झाली. आजघडीला ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. औषधी भांडाराच्या इमारतीसह प्रशिक्षण केंद्र आणि गेस्ट हाउसची स्वतंत्र इमारत याठिकाणी उभारण्यात आली आहे.
१२ ते १५ तासांत पोहोचतील औषधी
औरंगाबाद राज्याच्या केंद्रस्थानी आहे. औषधी १२ ते १५ तासांच्या आत कोणत्याही शहरांत पोहोचू शकतात. नागपूर आणि मुंबई या दोन शहरांना वेगाने जोडण्यासाठी समृद्धी महामार्ग झाला आहे. या मार्गाशी औरंगाबाद शहरही जोडले आहे. त्यामुळे औषधी भांडारातून नागपूर आणि मुंबईसह राज्यभरात काही तासांत औषधीपुरवठा शक्य होणार आहे.
विद्युतीकरणाचे काम शिल्लक
जवळपास ८० टक्के बांधकाम पूर्ण झालेले आहे. विद्युतीकरण आणि फर्निचरचे काम शिल्लक आहे. त्यासाठी ३.७९ कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. आगामी वर्षभरात काम पूर्ण होईल, यादृष्टीने प्रयत्न आहे.
-डाॅ. सुनीता गोल्हाईत, आरोग्य उपसंचालक
...असे आहे औषधी भांडार
- साडेबारा एकर जागा.
- औषधी भांडाराची इमारत.
- जी प्लस वन प्रशिक्षण केंद्रांची इमारत.
- जी प्लस दोन मजली गेस्ट हाउसची इमारत.