बीड बायपासला सर्व्हिस रोडसाठी अतिक्रमणे हटाव मोहिमेला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 04:33 PM2019-03-14T16:33:47+5:302019-03-14T16:38:03+5:30
सर्व्हिस रोड तयार करण्यासाठी मनपाकडून संथ गतीने कारवाई सुरू आहे.
औरंगाबाद : बीड बायपास रोडवर सलग तिसऱ्या दिवशीही सर्व्हिस रोड तयार करण्यासाठी कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने दिवसभरात दहापेक्षा अधिक मोठी अतिक्रमणे जमीनदोस्त केली.
४० हून अधिक मालमत्ताधारकांनी स्वत:हून अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली. सर्व्हिस रोड तयार करण्यासाठी मनपाकडून संथ गतीने कारवाई सुरू आहे. महापालिकेची हीच गती कायम राहिली तर सर्व्हिस रोड तयार करण्यासाठी किमान १ वर्ष लागू शकते.
बीड बायपास रोडवर सतत अपघात होत असल्याने पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सर्व्हिस रोड तयार करण्याचा विडा उचलला. या कामासाठी त्यांनी महापालिकेची मदत घेतली. वास्तविक पाहता सर्व्हिस रोड तयार करण्याचे दायित्व महापालिकेचे आहे. सोमवार, मंगळवार या दोन्ही दिवशी महापालिका, पोलिसांनी उत्तम कामगिरी बजावली. तिसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी महापालिकेची गती मंदावली. हॉटेल नंदिनीसमोरील काही छोटी-मोठी अतिक्रमणे काढताच मनपाच्या पथकाने विरुद्ध बाजूला मोर्चा वळविला. वास्तविक पाहता अजून पुढे बरीच अतिक्रमणे बाकी असताना युटर्न कशासाठी मारण्यात आला, याचे उत्तर मनपा अधिकाऱ्यांनी दिले नाही.
कालपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने १६ किलोमीटर सर्व्हिस रोड तयार करण्यात येणार असल्याचे मनपातर्फेच सांगण्यात आले होते. अंबरवाडी यांच्या भव्यदिव्य अतिक्रमणाला अगोदर जेसीबी लावण्यात आला. थोड्या वेळानंतर मनपाचे अधिकारी आले. अंबरवाडीकर यांच्या इमारतीपर्यंतच पोलीसांची हद्द आहे, त्यांच्याकडे न्यायालयाचा स्थगिती आदेश आहे. आमच्यावर अवमान याचिका दाखल होईल, असे मनपा अधिकाऱ्यांनी नमूद केले. सहायक पोलीस आयुक्त ज्ञानोबा मुंढे, पोलीस निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांनी मनपा अधिकाऱ्यांना कुठे आणि किती बंदोबस्त पाहिजे ते सांगा, आम्ही आताच द्यायला तयार आहोत. काल देवळाई चौकात मनपाचे अधिकारी एकही स्थगिती आदेश बघायला तयार नव्हते. आज अंबरवाडीकर यांच्यावर कारवाई करायची वेळ आल्यावर मनपाला सर्व नियम आठवू लागले का? असा प्रश्नही खाजगीत पोलीस अधिकाऱ्यांनी उपस्थित केला. बायपासवर सर्व्हिस रोड व्हावा ही पोलीस आयुक्तांची तीव्र इच्छा आहे. या कारवाईच्या आड कोणीही आले तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला.
अंबरवाडीकर यांना तरीही अभय
महापालिकेने दुपारी १ वाजता अंबरवाडीकर यांच्या वॉल कम्पाऊंडला कसाबसा जेसीबी लावला. अंबरवाडीकर यांचे राजकीय समर्थकही हळूहळू घटनास्थळी येऊ लागले. महापालिकेच्या जेसीबीने ज्या गतीने काम करायला हवे ती गतीच यावेळी हरवली. कधी लोखंडी गेट वाचविण्याचे प्रयत्न होऊ लागले तर कधी मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारावरील दोन कॉलमला अभय देण्यात येऊ लागले. इमारतीच्या कॅनोपीचे कॉलम मार्किंगमध्ये येतच नसल्याचे मनपा अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. शेवटी वॉल कम्पाऊंड पाडून मनपाने दुसरीकडे मोर्चा वळविला.
गार्डन कोर्टवर हातोडा
अंबरवाडीकर यांच्या बाजूलाच कार्डन कोर्ट रेस्टॉरंट आहे. फाईव्ह स्टार हॉटेलप्रमाणे सर्व बांधकाम केलेले होते. हॉटेच्या कम्पाऊंडसह आतील किमान २०-२० फुटांचा भाग सर्व्हिस रोडमध्ये येत होता. महापालिकेने येथेही नरमाईचे धोरण स्वीकारले. हॉटेलची संरक्षक भिंत पाडण्यात आली. उर्वरित अतिक्रमण जशास तसे ठेवण्यात आले.