कायगाव परिसरात खरिपाच्या तयारीला वेग...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:02 AM2021-05-20T04:02:11+5:302021-05-20T04:02:11+5:30
गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने अजूनही बऱ्याच भागात पाण्याची उपलब्धता आहे. त्यामुळे परिसरातील काही शेतकरी सध्या उसाची लागवड ...
गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने अजूनही बऱ्याच भागात पाण्याची उपलब्धता आहे. त्यामुळे परिसरातील काही शेतकरी सध्या उसाची लागवड करण्यात व्यस्त आहेत. दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यांत या भागातील शेतकऱ्यांकडून उसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते, तर भिवधानोरा, गळनिंब, अगरवाडगाव, धनगरपट्टी, आदी गोदावरी काठावरील गावांत सोयाबीन पेरणीचे प्रमाण आता दिवसेंदिवस वाढत आहे.
सद्या सर्वत्र शेत नांगरणीचे काम सुरू असून, शेत तयार करून मे महिन्याच्या अखेरपर्यंत बहुतांश भागातील शेतकरी कापसाची लागवड करण्याच्या तयारीत आहेत, तर कृषी विभागानेही हंगामात शेतकऱ्यांना गैरसोय होऊ नये यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे.
कृषी विभागाने यंदा गेल्या वर्षीपेक्षा पाच दिवस उशिराने म्हणजे १ जूनपासून कृषी सेवा केंद्रांना बियाणे विक्रीसाठी परवानगी दिली आहे. असे असले तरी, लॉकडाऊनमुळे खरिपासाठी बियाणे आणि खते शेतकऱ्याला सहज आणि रास्त भावात उपलब्ध होतील याचे नियोजन करण्याचे मोठे आव्हान कृषी खात्यासमोर आहे.
चौकट
भिवधानोरा परिसरात जवळपास ५० एकर क्षेत्रावर उन्हाळी सोयाबीनची पेरणी झाली होती. कृषी विभागाने गेल्या हंगामातच पुढील हंगामात लागणारे बियाणे स्वतः तयार करण्याचे नियोजन केले होते. उन्हाळी पिकांमुळे परिसरातील चालू खरीप हंगामातील सोयाबीन बियाण्यांचा प्रश्न मिटणार आहे. हेच बियाणे शेतकऱ्यांना पुढील पेरणीसाठी वापरता येणार आहे.
कोट
शेतकऱ्यांनी कपाशीचीच्या लागवडीची घाई करू नये
६५ मि.मी. पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड करू नये. हंगामपूर्व कापसाची लागवड केली आणि पाऊस उशिरा पडला तर कापसावर सेंद्रिय बोंडअळीचा प्रादुर्भाव पडण्याचा धोका असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस लागवडीची घाई करू नये. बीजप्रक्रिया करून पिकांची उतारास आडवी पेरणी करावी, पेरणी वेळीच खताचा बेसल डोस द्यावा. मका, सोयाबीन, मूग, आदींची पेरणी बीबीएफ पेरणी यंत्राने करावी.
- विष्णू मोरे, मंडळ कृषी अधिकारी.(पूर्व)..
फोटो : कायगाव परिसरात सध्या शेतकऱ्यांची ऊस लागवडीची लगबग सुरू आहे. (तारेख शेख)