नकोशा बाळांसाठी जीवनदायी ठरतोय 'स्वीकार पाळणा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 07:22 PM2020-11-18T19:22:11+5:302020-11-18T19:22:51+5:30

Aurangabad News शहरातील अनाथ बाळांचे संगोपन व त्यांना योग्य कुटुंबात दत्तक देणारी संस्था ‘साकार’ने ज्योतीनगरात संस्थेच्या कार्यालयाबाहेर पाळणा ठेवला आहे.

'Acceptance Palana' is life-saving for babies | नकोशा बाळांसाठी जीवनदायी ठरतोय 'स्वीकार पाळणा'

नकोशा बाळांसाठी जीवनदायी ठरतोय 'स्वीकार पाळणा'

googlenewsNext
ठळक मुद्देमागील ६ वर्षांत अभागी मातांनी ५ बाळांना टाकले या पाळण्यात

औरंगाबाद : ज्योतीनगरात रस्त्याचा कडेला एक पाळणा येणारा- जाणारांचे लक्ष वेधत आहे. हा पाळणा येथे का ठेवला असेल, असा प्रश्न पडला नसेल तर नवल. मात्र, मागील सहा वर्षांत अभागी मातांनी ५ नकोशी बाळांचा त्याग करून त्यांना या पाळण्यात सोडले आहे. सध्या हा पाळणा नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. 

जन्माला येणाऱ्या प्रत्येक बालकाला जगण्याचा अधिकार आहे. मात्र, काही माता अशा आहेत की, त्यांना आपल्या बाळाला नाईलाजाने त्यागण्याची वेळ येते. अनेकदा अशा बाळांना कुठे कचरा कुंडीत, तर कुठे निर्मनुष्य ठिकाणी, रस्त्याच्या कडेला टाकून दिले जाते किंवा त्यांची हत्या केली जाते. परिस्थिती कोणतीही असो; पण जन्माला आलेल्या बाळाला जगण्याचा हक्क आहे. 

यामुळेच शहरातील अनाथ बाळांचे संगोपन व त्यांना योग्य कुटुंबात दत्तक देणारी संस्था ‘साकार’ने ज्योतीनगरात संस्थेच्या कार्यालयाबाहेर पाळणा ठेवला आहे. तेथे ‘अनाथ तान्हुल्याचा स्वीकार पाळणा’ असे नाव दिले आहे. एखादी माता काही कारणास्तव आपल्या बाळचे पालन पोषण करण्यास असमर्थ असेल. त्याचा त्याग करायचा असेल, तर तिने भीती पोटी कोणत्याही असुरक्षित ठिकाणी बाळाला न सोडता, साकार संस्थेच्या या पाळण्यात आणून ठेवावे व तिथे असलेली बेल वाजवावी. अशी सूचना लिहिण्यात आली आहे.

१४ नोव्हेंबर २०१४ रोजी हा पाळणा ठेवण्यात आला आहे. आजपर्यंत ५ बाळांना या पाळण्यात ठेवून अभागी माता निघून गेल्या आहेत. यात प्रामुख्याने मुलींचा समावेश होता. या  पाळण्यामुळे त्या बाळांचा जीव वाचला व आज त्या बाळांना दत्तक विधानाद्वारे माता-पिता लाभले आहेत. पाळणा नसता, तर त्या बाळांचे काय झाले असते, याची कल्पना करवत नाही, असे या साकार संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी सांगितले. पाळण्यात बाळ आले की, आपण पहिले त्या बाळास उचलून कार्यालयात नेले जाते. नंतर बालकल्याण समितीला व पोलिसांना कळविले जाते. त्या बाळाची घाटीमध्ये तपासणी करून बालकल्याण समितीच्या आदेशाने त्या बाळास प्रवेशित करून घेतले जाते. पाळणा जिथे आहे तिथे एक बेल बसविली आहे व लिहिले आहे की, बाळ पाळण्यात ठेवल्यावर बेल वाजवावी. बेल वाजली की, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बघून मॅनेजर खात्री करून घेतात व बाळ  दिसल्यास आयाला बोलावून बाळ संस्थेत घेतले जाते, नंतर बालकल्याण समितीशी संपर्क साधला जातो.

बालकल्याण समितीच्या आदेशाने कार्य
सेंट्रल आडोप्शन रिसोर्स अथोरिटीच्या नियमानुसार साकार संस्थेने पाळणा ठेवला आहे. कोणी पाळण्यात बाळ आणून टाकल्यानंतर बेल वाजल्यावर लगेच त्या बाळाला संस्थेत नेले जाते व त्याची माहिती पोलिसांना व बालकल्याण समितीला दिली जाते. त्यानंतर तपासणीसाठी त्या अनाथ बाळाला घाटीत नेले जाते. बालकल्याण समितीच्या आदेशाने त्या बाळाला संस्थेत प्रवेश दिला जातो व नंतर दत्तक विधानाद्वारे त्या बालकास हक्काचे आई- वडील मिळवून दिले जातात. 
-नीलिमा पांडे, उपाध्यक्ष, साकार

Web Title: 'Acceptance Palana' is life-saving for babies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.