उमेवारांबाबत पक्षप्रमुखांचा निर्णय मान्य, शिंदे गटातही जाणार नाही; दानवेंचा विरोध मावळला
By बापू सोळुंके | Published: March 26, 2024 06:23 PM2024-03-26T18:23:55+5:302024-03-26T18:30:10+5:30
तुम्ही शिंदेंच्या शिवसेनेत जाणार का? या प्रश्नाचे उत्तर देताना आ. दानवे म्हणाले की, विरोधक म्हणत असतील मी येणार, मात्र मी शिंदे गटात जाणार नाही.
छत्रपती संभाजीनगर: लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून उद्या उमेदवारांची यादी जाहिर होणार आहे. उमेदवारांबाबत पक्षप्रमुखांचा निर्णय आपल्याला मान्य असेल , शिवाय शिंदे गटातही जाणार नसल्याचे विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. एवढेच नव्हे तर उमेदवारीबाबत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्याबाबतच असलेला दानवेंचा विरोधही मावळल्याचे त्यांच्या बोलण्यातून दिसून आले.
आ. दानवे यांनी मंगळवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला . ते म्हणाले की, औरंगाबाद लोकसभा मतदार संघात मी आणि चंद्रकांत खैरे यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. शिवसेनेच्या उमेदवारांची यादी उद्या जाहिर होण्याची शक्यता आहे. यादीत नाव असणं किंवा नसणं हा काही महत्वाचा विषय नाही. पक्ष संघटनेत जे निर्णय होतात, ते निर्णय मनाविरोधात असले तरी ते मान्य करावे लागतात, असे स्पष्ट केले. उमेदवार कोणीही असो, पक्षाचे काम करणार असल्याचेही सांगून आ.दानवे यांनी नेते खैरे यांच्याविरोधात उपसलेली तलवार मॅन केल्याचे संकेत दिले.
तुम्ही शिंदेंच्या शिवसेनेत जाणार का? या प्रश्नाचे उत्तर देताना आ. दानवे म्हणाले की, विरोधक म्हणत असतील मी येणार, मात्र मी शिंदे गटात जाणार नाही. मी उद्धव ठाकरे यांचा कार्यकर्ता आहे. महायुतीला येथे उमेदवार मिळत नाही, ही त्यांची आणि विशेषत: भाजपची हार असल्याची टीका आ. दानवे यांनी केली. डॉ. प्रकाश आंबेडकर यांची भूमिका सकारात्मक असावी, अशी आमची अपेक्षा आहे. ते पुन्हा महाविकास आघाडीत सहभागी होतील, अशी आशाही आ.दानवे यांनी व्यक्त केली.
निवडणुका आल्याने जानकरावर प्रेम आलं
रासप चे नेते महादेव जानकर यांचा यापूर्वी पावलो पावली अपमान करण्यात आला आहे. हे जानकर यांनी विसरू नये , निवडणुका आल्याने त्यांचं जानकरांवर प्रेम आल्याची टीका आ.दानवे यांनी भाजप वर केली. महादेव जानकर यांनी मराठवाड्यात येण्याची इच्छा आहे. त्यांचा गेम त्यांचेच लोक करतील - दानवे