'११ महिन्यांत ५०४ जणांचा अपघाती मृत्यू'; शहरापेक्षा ग्रामीण भागात अपघातामध्ये मृतांची संख्या जास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2022 04:45 PM2022-01-04T16:45:26+5:302022-01-04T16:48:55+5:30
वेग आवरा, वाहन हळू चालवा
- राम शिनगारे
औरंगाबाद : शहर, जिल्ह्यामध्ये २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये अपघातांची संख्या वाढली आहे. २०२० मध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन लावलेले होते. या काळात रस्त्यावर वाहने येत नव्हती. त्यामुळे अपघातांची संख्या घटली होती. २०२१ मध्ये लॉकडाऊन उठल्यानंतर वाहने रस्त्यावर आली. त्यातही प्रत्येकाला स्वत:च्या वाहनातूनच प्रवास करायचा असल्यामुळे अपघातांची संख्या वाढल्याचे आकडेवारीतून दिसते आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात अपघातामध्ये मृतांची संख्या मोठी आहे. शहरातील बीड बायपासवर अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांचे प्रमाण अधिक असल्याचेही आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
११ महिन्यांत ५०४ जणांचा मृत्यू
शहर आणि जिल्ह्यामध्ये १ जानेवारी ते ३१ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत तब्बल ५०४ जणांचा अपघातामध्ये मृत्यू झाला. यातील १३९ मृत्यू हे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये झाले आहेत. ग्रामीण पोलिसांच्या हद्दीमध्ये अपघातात ३६५ मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली. शहरात नोव्हेंबरपर्यंत ४२७ अपघात झाले. त्यात ३५८ जण गंभीर जखमी झाले. १३९ जणांचा मृत्यू झाला. ग्रामीणमध्ये नोव्हेंबरपर्यंत ५४० अपघात झाले आहेत. त्यात जीवघेण्या अपघातांची संख्या ३३६ आहे. त्यात एकूण ३६५ जणांना प्राणास मुकावे लागले. जखमींची संख्या २५४ आहे.
सर्वाधिक मृत्यू बीड बायपासवर
शहर पोलिसांच्या हद्दीत झालेल्या अपघातात सर्वाधिक मृत्यू हे बीड बायपासवर झाले आहेत. त्यातच आता बीड बायपासचे काम सुरू असून, नवीन बायपास वाहतुकीला खुला झाला आहे. त्यावरही अपघातांची मालिका सुरू झाली आहे. त्यामुळे बायपासवर वाहन हळू चालविण्याची गरज आहे. ग्रामीण भागात राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील अपघातांमध्ये सर्वाधिक व्यक्तींचा मृत्यू झाल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेल्मेट घाला, सीट बेल्ट लावा
शहरातील अपघातांमध्ये मृत्यू पावलेल्यांमध्ये दुचाकीस्वारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेट घातले पाहिजे. याशिवाय चारचाकी गाडीमध्येही सीट बेल्ट लावलेला असेल तरच अपघाताच्या वेळी सुरक्षेसाठी असलेली यंत्रणा कार्यरत होते. त्यामुळे सीट बेल्ट लावलाच पाहिजे, असे आवाहन गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी केले.
वेग आवरा
रस्त्यावर वाहन चालविताना काही वेगाची मर्यादा घालून दिलेली आहे. ही मर्यादा ओलांडू नये. वेगावर आवर घातल्यास प्राणांतिक अपघातांची संख्या कमी होऊ शकते, असेही निरीक्षक आघाव यांनी सांगितले.