पंक्चर चाक दुरुस्त करून नेताना ट्रॅक्टर चालकाचा अपघाती मृत्यू, एकजण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 04:27 PM2023-01-14T16:27:13+5:302023-01-14T16:31:30+5:30
पहाटे साडेतीन वाजता बाळापुरजवळ एका भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली.
सिल्लोड (औरंगाबाद) : तालुक्यातील जळगाव-औरंगाबाद रस्त्यावर बाळापूरजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवर पाठीमागे बसलेला तरुण गंभीर जखमी आहे. हा अपघात आज पहाटे साडेतीन वाजता झाला.
शेख शमशुद्दीन शेख जहिरूद्दीन ( ४६, रा.अजिंठा ) असे मृताचे नाव आहे. तर शाहरुख ( २२ ) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याबाबत प्राथमिक माहिती अशी की, शेख शमशुद्दीन शेख जहिरूद्दीन आणि शाहरुख हे दोघे ट्रॅक्टरवर काम करतात. शुक्रवारी ट्रॅक्टरचे एक चाक पंक्चर झाल्याने ते दोघे बाळापूर येथे नादुरुस्त टायर घेऊन आले होते. टायर दुरुस्त झाल्यानंतर दोघेही दुचाकीवरून दिग्रसकडे निघाले.
दरम्यान, पहाटे साडेतीन वाजता बाळापुरजवळ एका भरधाव चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात शेख शमशोद्दीन यांचा जागीच मृत्यू झाला. तर शाहरुख गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी पोलिसांना माहिती देत दोघांनाही अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी शाहरुखवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात रवाना केले.
अजिंठा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अजित विसपुते, फौजदार आर डी राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.अजिंठा पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यू दाखल झाला आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत.