तीन तासांत दोघांचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 12:55 AM2018-04-30T00:55:41+5:302018-04-30T00:56:16+5:30
रस्त्याची चाळणी : नागपूर -मुंबई महामार्ग बनला मृत्यूचा सापळा
लासूर स्टेशन : अवघ्या तीन तासांत झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात मोटारसायकलवरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नागपूर -मुंबई महामार्गावरील आरापूर-वसूसायगाव दरम्यानच्या तीन किलोमीटर अंतरावर रविवारी घडली.
या महामार्गावर गेल्या सहा दिवसांत झालेल्या चार अपघातात चार जणांचा बळी गेला आहे. अत्यंत दयनीय अवस्था झालेला नागपूर -मुंबई महामार्ग हा दुचाकीस्वारांसाठी मृत्यूचा सापळा ठरत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
नारायण मुरलीधर लंबे (४८, रा.भोकरगाव ता. वैजापूर) असे रविवारी दुपारी अडीच वाजता झालेल्या अपघातातील मयताचे नाव आहे. तर सायंकाळी साडेपाच वाजता झालेल्या अपघातातील मयताचे नाव संदीप नारायण राठोड (२८, रा.राणेगाव, ता. शेवगाव) असे आहे.
नारायण व त्यांचे भाऊ राजाराम हे दोघे कांदा चाळीसाठी स्टील बघण्यासाठी करोडी परिसरातील कंपनीत गेले होते. परत येत असताना दुपारी अडीच वाजता आरापूर शिवारात एका हॉटेलसमोर वैजापूरकडून येणारा ट्रक क्रमांक सी. जी. ०७. आर. यू.९२२२ व औरंगाबादकडून येणारी मोटारसायकल क्रमांक जी. जे. ०५ सी.सी. २७३९ यांची समोरासमोर धडक झाल्याने नारायण यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे भाऊ राजाराम मुरलीधर लंबे हे गंभीर जखमी झाले.
या अपघातानंतर तीन तासात वसूसायगाव येथील गतिरोधकाजवळ आयशर टेम्पोने मोटरसायकलस्वारास चिरडल्याची घटना घडली. संदीप नारायण राठोड हा त्याचा मामेभाऊ किशोर उत्तम चव्हाण (रा. अंबड तालुका) याच्यासोबत मोटारसायकल क्रमांक एम. एच. २३. ए. क्यू. ५२७५ वरून औरंगाबाद येथून येत असताना पाठीमागून येणाऱ्या आयशर टेम्पो क्रमांक एम. एच. २३. डब्ल्यू. ९९७ने धडक दिली. यात चाकाखाली चिरडल्याने संदीपचा जागीच मृत्यू झाला. लासूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. भाग्यश्री डोंगरे व डॉ. सोनाली जानकर यांनी दोघांना तपासून मयत घोषित केले. नागपूर -मुंबई महामार्गाची अक्षरश: चाळणी झाली असून, खड्डे वाचविण्यासाठी वाहनधारकांना रॉग साईडने वाहन घ्यावे लागते. त्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
गेल्या सहा दिवसात गेले चार बळी
२३ एप्रिल रोजी विश्वंभर मदन मोगरे (२७, रा. आहेर बोरगाव, ता. सेलू. जि. परभणी), २७ रोजी शिवनाथ सोमनाथ साठे (३२, रा. माळीवाडा ता. जि. औरंगाबाद) व २९ एप्रिल रोजी हे दोघे गतप्राण झाले.