गेल्या वर्षभरात ३७ विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:02 AM2021-05-24T04:02:16+5:302021-05-24T04:02:16+5:30
-२२ कुटुंबीयांना पोहचली मदत, १३ पालकांना अनुदानाची प्रतीक्षा --- औरंगाबाद : लाॅकडाऊनच्या गेल्या वर्षभराच्या काळात ३८ शाळकरी विद्यार्थ्यांचा विविध ...
-२२ कुटुंबीयांना पोहचली मदत, १३ पालकांना अनुदानाची प्रतीक्षा
---
औरंगाबाद : लाॅकडाऊनच्या गेल्या वर्षभराच्या काळात ३८ शाळकरी विद्यार्थ्यांचा विविध कारणांनी अपघाती मृत्यू झाला. यात सर्वाधिक १९ विद्यार्थी पाण्यात बुडून तर रस्ता अपघातात ४, विजेच्या धक्क्याने ४, विहिरीत पडून ३, सर्पदंशाने ३ तर ६ जणांचा इतर कारणांनी मृत्यू झाल्याची माहीती शिक्षण विभागाने दिली. यापैकी ३५ विद्यार्थी राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेला पात्र ठरले. तर त्यापैकी २२ जणांच्या कुटुंबीयांना मदतीचे वाटप करण्यात आले तर १३ पालक अनुदानाअभावी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
पहिली ते बारावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत ७५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाते. तर २ अवयव अपघातात निकामी झाल्यास ५० हजार तर एक अवयव निकामी होऊन अपंगत्व आल्यास ३० हजारांची मदत दिल्या जाते. गेल्या वर्षभराच्या काळात ३८ विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू होऊन त्यांना सानुग्रह अनुदान मागणीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीकडे दाखल झाले होते. त्यापैकी १ मृत्यू न्युमोनियामुळे नैसर्गिकरीत्या झाला तर २ प्रस्तावात त्रुटी आढळून आल्याने त्यांना पुढील समितीच्या बैठकीवेळी कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगण्यात आले. तर ३५ प्रस्ताव मदतीसाठी समितीने पात्र ठरवले गेले. त्यापैकी २२ जणांना ७५ हजार रुपये प्रत्येकी असे १६ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान दिले गेले. तर १३ जणांना मदतीसाठी ९ लाख ७५ हजार रुपयांची मागणी शासनाकडे शिक्षण विभागाने केली. ते अनुदान प्राप्त होताच अनुदानाचे वाटप होईल, असे शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जयस्वाल यांनी सांगितले.
--
३५ पैकी १९ मृत्यू पाण्यात बुडून
--
अनुदानाला पात्र ठरलेल्या प्रस्तावात १९ विद्यार्थी पाण्यात बुडून तर ३ विहिरीत पडून मृत्युमुखी पडले. हे अपघाताचे प्रमाण चिंताजनक असून खदानी, नदी, विहिरीत पोहायला गेलेल्यांचे प्रमाण यात अधिक आहे. हे अपघात घटवण्यासाठी पालकांसह गावकऱ्यांकडूनही लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
--
--
या कारणांनी झाले विद्यार्थ्यांचे मृत्यू
---
पाण्यात बुडून मृत्यू -१९
रस्ता अपघातात मृत्यू -४
विजेचा शाॅक लागून मृत्यू -४
विहिरीत पडून मृ्त्यू -३
सर्पदंशाने मृत्यू -२
पत्रावरील दगड पडून मृत्यू -१
विषबाधा होऊन मृत्यू -१
ट्रॅक्टरच्या मोगड्याखाली पडून मृत्यू -१
लोखंडी गाड्याखाली दबून मृत्यू -१
कुत्रा चावल्याने मृत्यू -१
न्युमोनियामुळे मृत्यू (नैसर्गिक)-१
---