विज्ञान व आहारशास्त्रानुसार सूर्याच्या उत्तरायण प्रवेशामुळे संक्रांत ठरते ‘आरोग्यदायिनी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 07:23 PM2020-01-16T19:23:04+5:302020-01-16T19:27:51+5:30
संक्रांतीच्या काळात शेतात नवे धान्य, भाजीपाला येतो. आपापल्या शेतात आलेला हा वाणवसा एकमेकींना देऊन संक्रांत साजरी केली जाते.
- रुचिका पालोदकर
औरंगाबाद : पौष महिन्यात येणारा आणि शेतीशी संबंधित एक महत्त्वाचा सण म्हणजे संक्रांत. संक्रांतीच्या काळात शेतात नवे धान्य, भाजीपाला येतो. आपापल्या शेतात आलेला हा वाणवसा एकमेकींना देऊन संक्रांत साजरी केली जाते. या आनंदोत्सवाला जोड मिळते, ती आरोग्यदायी ठरणाऱ्या तीळगुळाची आणि पतंगांच्या पेचबाजीची. त्यामुळेच तर विज्ञान आणि आहारशास्त्रानुसार संक्रांतीला होणारा सूर्याचा उत्तरायण प्रवेश आरोग्यदायी मानला जातो.
संक्रांतीच्या वाणात हरभरे, गव्हाची ओंबी, गाजर, बोरे, उसाची पेरे यांचा समावेश असतो. मातीच्या सुगड्यांमध्ये हे सर्व पदार्थ थोड्या-थोड्या प्रमाणात टाकायचे आणि त्यांची पूजा करायची. एकमेकींना हे वाण द्यायचे, अशा पद्धतीने संक्रांत सण साजरा केला जातो. या सगळ्यांमधून मुख्यत: शेतीत उत्पादित होणाऱ्या मालाच्या देवाण-घेवाणीलाच अधिक महत्त्व असल्याचे दिसते.
संक्रांतीमागचे शास्त्रीय कारण
साधारणपणे भारतामध्ये बहुतांश सण चंद्रावर आधारित पंचांगाद्वारे साजरे केले जातात; परंतु संक्रांत हा असा सण आहे, जो सूर्यावर आधारित पंचांगाच्या गणनेनुसार साजरा होतो. यादिवशी सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो. मकरसंक्रांतीपासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. मकरसंक्रांतीनंतर ऋतू परिवर्तन होत असल्यामुळे वातावरणातील बदल सहजच जाणवतो. शरद ऋतू क्षीण होतो आणि वसंत ऋतूचे आगमन सुरू होते. यानंतर दिवस मोठा आणि रात्री लहान होत जाते.
संक्रांत साजरी करण्याच्या पद्धती-
- दक्षिण भारतीय लोक पीक कापणी झाल्यानंतर पोंगल सण साजरा करून आनंद व्यक्त करतात. यामध्ये चांगला पाऊस, उत्तम जमीन आणि उत्तम धनधान्यासाठी परमेश्वराचे, निसर्गाचे आभार मानतात. पोंगल सणाच्या पहिल्या दिवशी कचरा जाळला जातो. दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन होते आणि तिसऱ्या दिवशी पशुधनाची पूजा होते.
- गुजरातमध्ये पतंग उडवून संक्रांत साजरी केली जाते. तीळ व शेंगदाणा चिक्कीला याप्रसंगी महत्त्व असते.
- पिकांची छाटणी झाल्यानंतर येणाऱ्या लोहरी सणाला पंजाबी बांधव सायंकाळी होलिकादहन करतात. तीळगूळ आणि मका अग्नीला प्रसाद स्वरूपात अर्पण करतात.
- आसाममध्ये या काळात तांदूळ, नारळ आणि ऊस यांचे पीक येते. त्यामुळे यापासून बनविलेले पदार्थ बनवून ते भोगाली बिहू साजरी करतात. होलिकादहन करून त्यामध्ये तीळ व नारळापासून बनविलेले पदार्थ अर्पण करतात. यादरम्यान ते लोक पारंपरिक टेकेली भोंगा खेळ खेळतात.
‘दिल की पतंग आज उड़ी उड़ी जाय...’
दक्षिणायन सुरू असतानाची सूर्यकिरणे कमी प्रतीची मानली जातात; पण त्याउलट उत्तरायणातली सूर्यकिरणे ही आरोग्य आणि शांतिदायक असतात. वैज्ञानिकदृष्ट्या उत्तरायणात सूर्याच्या उष्णतेत शीत प्रकोप तसेच हिवाळ्यात होणाऱ्या आजारांना दूर करण्याची क्षमता असते. दुसरीकडे पतंग हे आनंद, शुभ आणि स्वातंत्र्याचे प्रतीक मानले जाते. या काळातली सूर्यकिरणे फायदेशीर ठरतात.
तीळगुळाचे फायदे
एकमेकांना तीळगूळ देऊन नाते दृढ करणारा आणि एका दृष्टीने सामाजिक सलोखा वाढविणारा सण म्हणजे संक्रांत. संक्रांत ते रथसप्तमी या काळात एकमेकांना तीळगूळ दिले जाते. आरोग्याच्या दृष्टीनेही हिवाळ्यात तीळगूळ सेवन करणे फायद्याचे ठरते.
- तीळगूळ एकत्र खाल्ल्याने सर्दी, खोकला, कफ हा त्रास कमी होतो.
- शरीराचे तापमान आणि बाह्य तापमान यात संतुलन राखण्यास मदत होते आणि शरीराला ऊर्जा मिळते.
- तिळामध्ये कॉपर, मॅग्नेशियम, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, झिंक, फायबर यासोबतच अॅन्टीआॅक्सिडंटस्चे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे शरीरात विविध आजारांचे जिवाणू असतील, तर ते नष्ट करण्याचे प्रमुख काम तिळाद्वारे होते.
- तीळ हा स्निग्धपदार्थ असल्यामुळे हिवाळ्यात त्याचे सेवन उपयुक्त ठरते.
मकरसंक्रांत आणि आरोग्य
संक्रांत हा सण तीन दिवसांचा असतो. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी, दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत किंवा कर असते. यावर्षी हे तीन दिवस अनुक्रमे दि.१४, १५ व १६ जानेवारी रोजी आले आहेत. वर्षभर सामान्यपणे आपण जे पदार्थ करीत नाही, अशा पदार्थांचा बेत भोगी आणि संक्रांतीच्या दिवशी केला जातो. आहारात होणारा हा बदल प्रामुख्याने आरोग्याशी संबंधित असल्याचे अभ्यासक सांगतात.तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी, विविध भाज्यांचे मिश्रण असलेली एकत्र भाजी आणि डाळ, तांदूळ भाजून घेऊन केलेली खिचडी हे पदार्थ भोगीच्या दिवशी बनविले जातात.संक्रांतीच्या दिवशी तीळगुळाची पोळी आणि तीळगुळाचे लाडू असतात.
बाजरीच्या भाकरीला विशेष महत्त्व
बाजरी हे तंतुमय धान्य असून यामध्ये लोह, मॅग्नेशियम, कॉपर, व्हिटॅमिन यांचे प्रमाण जास्त असते. बाजरी उष्णतावर्धक असल्यामुळे हिवाळ्यात ऊर्जा देणारा प्रमुख स्रोत म्हणून बाजरीकडे पाहिले जाते. बाजरी खाल्ल्यामुळे बऱ्याच वेळ भूक लागत नाही. त्यामुळे वजन कमी करण्यासाठीही बाजरी सेवन हा उत्तम पर्याय मानला जातो. बाजरीमुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते, तसेच मॅग्नेशियम व पोटॅशियममुळे रक्तदाबही नियंत्रणात राहतो. बाजरी तंतुमय धान्य असल्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होते. खिचडीच्या सेवनाने पचनक्रिया सुलभ राहते. भोगीच्या दिवशी तयार करण्यात येणारी खिचडी गाजर, मटार, वालाच्या शेंगा यांचे सुरेख मिश्रण केलेली असते.
विविध नावांनी ओळखली जाते संक्रांत
- पंजाब, हिमाचल प्रदेश- लोहडी
- बिहार, कर्नाटक, आंध्र- संक्रांती
- आसाम- भोगाली बिहू
- पश्चिम बंगाल, ओडिसा- मकरसंक्रांती
- गुजरात, राजस्थान- उत्तरायण किंवा पतंगनो तहेवारे
- तमिळनाडू- पोंगल
- थायलंड- सोंग्क्रान
- म्यानमार- थिंगयान