अविश्वासावर आरोप-प्रत्यारोप
By Admin | Published: September 24, 2016 12:26 AM2016-09-24T00:26:35+5:302016-09-24T00:30:36+5:30
औरंगाबाद : उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय औताडे यांच्या विरोधात भाजपच्या संचालकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला.
औरंगाबाद : उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय औताडे यांच्या विरोधात भाजपच्या संचालकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला. यानंतर येथील ‘राजकारण’ गरम झाले आहे. सत्ताधारी व विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, सध्या तरी विरोधकांचे पारडे जड दिसत
आहे.
गुरुवारी भाजपच्या संचालकांनी काँग्रेसचे दोन व व्यापारी संचालक दोन, अशा चार जणांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सभापतीच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला. बाहेरगावी असलेले सभापती संजय औताडे जाधववाडीतील कृउबाच्या कार्यालयात आले. आपल्या सहकारी संचालकांसोबत त्यांनी चर्चा केली. यानंतर आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली.
आमचे संचालक फोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात ‘घोडेबाजार’ झाला असून, या कट-कारस्थानामागे थेट विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचा हात असल्याचा आरोप औताडे यांनी केला. यावर उपसभापती भागचंद ठोबरे म्हणाले की, सर्व संचालकच सभापतींच्या मनमानी कामकाजाला वैतागले होते. यामुळे अविश्वास प्रस्ताव आणला असून, काँग्रेसचे आणखी तीन संचालक आमच्या संपर्कात असल्याचे सांगून त्यांनी बॉम्बगोळा टाकला.
भाजपचे संचालक दामोदर नवपुते म्हणाले की, हरिभाऊ बागडे यांच्याबद्दल बोलण्याची औताडे यांची लायकी नाही. संचालकांना फोडायचे असते तर सुरुवातीलाच ते केले असते. तेव्हा एकाच संचालकाची आम्हाला गरज होती. औताडे सभापती झालेच नसते, असाही टोला त्यांनी लगावला. व्यापारी प्रतिनिधी संचालक प्रशांत सोकिया यांनी सांगितले की, २००७ मध्ये होलसेल किराणा व्यापाऱ्यांसाठी जाधववाडीत प्लॉट देण्याचा निर्णय झाला होता. त्याच मुद्द्यावर आम्ही संजय औताडे यांना पाठिंबा दिला. वर्ष पूर्ण झाले, पण कोणताच ठोस निर्णय घेत नसल्याने अखेर आम्ही त्यांच्या विरोधातील अविश्वास ठरावावर सह्या केल्या.
कृउबा समितीवर २०१५ मध्ये काँग्रेसचे ७ उमेदवार व भाजपचे ७ उमेदवार निवडून आले होते. व्यापारी प्रतिनिधी २ व १ हमाल-मापाडी संचालक व १ अपक्ष म्हणून संजय औताडे निवडून आले होते. औताडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला व हमाल-मापाडी संचालक देवीदास कीर्तिशाही यांनी त्यांना पाठिंबा दिला. २ व्यापाऱ्यांनी भाजपला साथ दिली. यामुळे काँग्रेसचे ९ संचालक व भाजपचे ९ संचालक, अशा दोन्ही बाजू समसमान झाल्या होत्या. सभापतीपदासाठी चिठ्ठी टाकण्यात आली. त्याद्वारे सभापतीची माळ काँग्रेसचे संजय औताडे यांच्या गळ्यात पडली.
उपसभापती भाजपचे भागचंद ठोंबरे झाले. यास वर्षभराचा कालावधी उलटला. गुरुवारी काँग्रेसच्या सभापतीच्या विरोधात भाजपने अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. भाजपने काँग्रेसच्या दोन संचालकांना फोडले. यामुळे आता भाजपचे संख्याबळ ११ झाले आहे. आणखी काँग्रेसचे दोन संचालक संपर्कात असल्याचा दावा उपसभापती भागचंद ठोंबरे यांनी केला आहे. हमाल-मापाडी संचालक कीर्तिशाही काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे सध्या तरी विरोधकांचे पारडे जड दिसत आहे.