खुनातील आरोपीने दिल्या पोलिसांच्या हातावर तुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 12:27 AM2017-08-29T00:27:29+5:302017-08-29T00:27:29+5:30
तीन खून आणि दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देत रुग्णालयातून पोबारा केल्याची घटना रविवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडली़ आरोपीला रामतीर्थ पोलिसांनी उपचारासाठी विष्णूपुरी येथील रुग्णालयात दाखल केले होते़ दोन महिन्यांत रुग्णालयातून आरोपी पळण्याची ही दुसरी घटना आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: तीन खून आणि दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देत रुग्णालयातून पोबारा केल्याची घटना रविवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडली़ आरोपीला रामतीर्थ पोलिसांनी उपचारासाठी विष्णूपुरी येथील रुग्णालयात दाखल केले होते़ दोन महिन्यांत रुग्णालयातून आरोपी पळण्याची ही दुसरी घटना आहे़
सरसूदसिंग ऊर्फ शाहू उमरसिंग फौजी (वय ३१) असे आरोपीचे नाव आहे़ त्याच्यावर २०१२ ते २०१४ या काळात मरखेल, बिलोली या ठिकाणी झालेल्या खुनाच्या गुन्ह्याचा आरोप आहे़ एकूण तीन खून आणि दरोड्यासह इतरही अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत़ रामतीर्थ पोलिसांनी त्याला शासकीय कामात अडथळा या गुन्ह्याखाली अटक केली होती़ त्यानंतर २६ आॅगस्ट रोजी या गुन्ह्यातील त्याची शिक्षाही संपली होती, परंतु त्याच्यावर दाखल असलेल्या इतर गुन्ह्यांची प्रक्रिया सुरु होती़ त्यातच त्याची प्रकृती बिघडल्याने रविवारी रात्री त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले होते़ या ठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या कर्मचाºयांची नजर चुकवून रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास त्याने रुग्णालयातून पळ काढला़ थोड्याच वेळात कर्मचाºयांना ही बाब समजल्यानंतर सर्वत्र त्याचा शोध घेण्यात आला़, परंतु तो सापडला नाही़