खून खटल्यांच्या तपासातील सुसूत्रता आणि सातत्याच्या अभावामुळे मारेकरी मोकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 08:06 PM2020-03-16T20:06:25+5:302020-03-16T20:09:04+5:30
अनेक खुनाचा तपास गुलदस्त्यात राहण्याची शक्यता
औरंगाबाद : श्रुती भागवत, अमिनाबी पटेल, अंकुश खाडे, तसेच जुना मोंढा परिसरातील काळीबावडी येथे झालेल्या सेल्समनच्या खुनाच्या तपासाप्रमाणेच गुलमंडीवरील कमलेश ऊर्फ प्रकाश पटेल यांच्या खुनाचा तपास गुलदस्त्यात राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खबऱ्याचे तुटलेले नेटवर्क, तपासातील सुसूत्रता आणि सातत्याच्या अभावामुळे पोलीस मारेकऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नाहीत.
गुलमंडीतील नगारखाना गल्लीतील कुरिअर कंपनीचा व्यवस्थापक कमलेश ऊर्फ प्रकाश पटेल यांचा ३१ जानेवारी रोजी चाकूने भोसकून निर्घृण खून करण्यात आला. या घटनेला दीड महिना होत आला तरी पोलिसांना मारेकऱ्याचे धागेदोरे मिळाले नाहीत. सिटीचौक आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या खुनाचा तपास करण्यासाठी सुरुवातीला काही दिवस प्रयत्न केले. आता वाहनचोरी, अवैध दारू विक्रे त्यांना पकडणे आदी किरकोळ स्वरूपाच्या कारवाया करताना पोलीस दिसतात. गुन्ह्याच्या तपासाशिवाय पोलिसांची सर्वाधिक शक्ती बंदोबस्ताच्या कामावर खर्ची होते. परिणामी, तपासात सातत्य राहत नाही. झोकून देऊन काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा तपास पथकात अभाव असेल तर यश मिळत नसल्याचे दिसून येते.
रखडलेले तपास
१८ मे २०१२ रोजी उल्कानगरी परिसरातील रहिवासी शिक्षिका श्रुती भागवत यांचा घरात घुसून अज्ञात मारेकऱ्यांनी निर्घृण खून केला होता. हत्येनंतर त्यांचा मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्नही झाला होता. या घटनेला आठ वर्षे होत आले तरी मारेकरी पोलिसांना पकडता आले नाहीत.
२०१३ साली दूधविक्रेता अंकुश खाडे यांचा गोळी झाडून खून क रण्यात आला. अंकुशच्या खुनाचा तपास मुकुंदवाडी पोलीस आणि गुन्हे शाखेने समांतर पातळीवर केला. मात्र, पोलीस मारेकऱ्यांपर्यंत पोहोचू शकले नाहीत. शेवटी या गुन्ह्याच्या तपासाची अ समरी तयार करून तत्कालीन तपास अधिकारी मोकळे झाले.
३० आॅगस्ट २०१४ रोजी मिटमिटा शिवारात गुरे चारण्यासाठी गेलेल्या अमिनाबी पठाण यांचा निर्घृण खून करून मारेकऱ्यांनी त्यांचा मृतदेह झाडाला लटकावला होता. याविषयी छावणी ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला होता. गुन्हे शाखेने या घटनेचा तपास अनेक दिवस केला. मात्र, अजूनही अमिनाबी यांचे मोरकरी मोकाट आहेत.
२०१७ मध्ये सिटीचौकातील औषधी दुकानावर सेल्समन म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीचा निर्घृण खून करून मृतदेह जुना मोंढा नाक्याजवळील काळीबावडीजवळ फेक ण्यात आला होता. या खुनाचा उलगडाही पोलिसांना करता आला नाही.
गुन्हे तपासाऐवजी बंदोबस्तासाठीच पोलिसांचा वापर
पूर्वीची बीट आणि पोलीस चौकीची अत्यंत महत्त्वाची होती. चौकीत फौजदार बसायचे तर बीट हवालदार रात्रंदिवस बीटमध्ये राहून जनतेशी संपर्क ठेवत. यामुळे त्याच्या बीटमध्ये घडणाऱ्या प्रत्येक हालचालींची माहिती त्यांना मिळत होती. आता बीट हवालदारांना आंदोलन, मोर्चा, सभा, संमेलनाच्या बंदोबस्तासाठी नेमले जाते. परिणामी तपास कामात सातत्य न राहिल्यास कोणत्याही गुन्ह्यांचे तपास रखडतात.
- नरेश मेघराजानी, निवृत्त पोलीस उपअधीक्षक