घरफोडीतील आरोपी चार महिन्यानंतर अटकेत
By Admin | Published: July 15, 2017 12:16 AM2017-07-15T00:16:48+5:302017-07-15T00:17:29+5:30
मानवत : मानवत शहरात चार महिन्यापूर्वी झालेल्या घरफोडीच्या घटनेतील एका आरोपीस स्थागुशाच्या पथकाने अटक करून ताब्यात घेतले आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत : मानवत शहरात चार महिन्यापूर्वी झालेल्या घरफोडीच्या घटनेतील एका आरोपीस स्थागुशाच्या पथकाने अटक करून ताब्यात घेतले आहे़ तसेच त्याच्याकडून २ लाख २६ हजार रूपयांचा ऐवज हस्तगत केला आहे़ न्यायालयाने आरोपी दीपकसिंग टाक यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मानवत नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांच्या रचना कॉलनीतील घरी २३ मार्च रोजी मध्यरात्री धाडसी चोरी झाली होती. या प्रकरणी उमेश ढाकणे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता. या घटनेत ३ लाख ४४ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख २५ हजार रुपये लंपास केले होते. भर वस्तीत चोरीची घटना घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांना तपासही लागत नव्हता. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक करीत होते.
तपासा दरम्यान या घटनेतील आरोपी मानवत येथेच असल्याची माहिती मिळाली.
यावरून दीपकसिंग प्रल्हादसिंग टाक (वय २२, रा. गुरूगोविंदनगर, जालना ह.मु. मानवत) यास १२ जुलै रोजी ताब्यात घेतले. चौकशी केली असता ही चोरी केल्याचे टाक याने मान्य केले.
त्याच्या घराची झडती घेतली असता २ लाख २६ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आढळले. हे दागिने जप्त करण्यात आले आहेत.