केबल चोरणारे आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:03 AM2021-05-14T04:03:26+5:302021-05-14T04:03:26+5:30
सिल्लोड : अजिंठा जळगाव भागातील विद्युत खांबावरील केबल चोरणाऱ्या दोन आरोपीना शेतकऱ्यांनी रंगेहाथ पकडून अजिंठा पोलिसांच्या स्वाधीन केले. ...
सिल्लोड : अजिंठा जळगाव भागातील विद्युत खांबावरील केबल चोरणाऱ्या दोन आरोपीना शेतकऱ्यांनी रंगेहाथ पकडून अजिंठा पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी अजिंठा पोलिसांनी गुन्हा दाखल करून ६० हजार रुपये किमतीची ११० मीटर केबल जप्त केली.
औरंगाबाद जळगाव रस्त्यावर नवीन खांब उभे करीत त्यावर केबल टाकण्याचे काम सुरू आहे. पण गेल्या काही दिवसांपासून या भागातून रात्री केबल चोरी करण्याच्या घटना वाढल्या आहे. १५ दिवसांपूर्वी एक लाखाची केबल चोरी झाली होती. पुन्हा बुधवारी रात्री चोरी करणाऱ्या महेश एकनाथ निकम (३० ), समीर जाबीर तडवी (१९, दोघे रा. बिलवाडी, ता. जामनेर, जि. जळगाव) यांना केबल व धारदार शस्त्र कुऱ्हाडीसहीत अजिंठा ग्रामपंचायत सदस्य समी चाऊस व शेतकरी नासीर शेख यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांच्या जवळून काळ्या रंगाची केबल वायर आणि दुचाकी हस्तगत करण्यात आली. या प्रकरणी एका कंपनीच्या सुपरवायझर यल्लासरी हेमचंद्र रेड्डी यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. तपास अक्रम पठाण करीत आहेत.
----- मोठे मासे अडकण्याची दाट शक्यता -----
अजिंठा परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. दुचाकी चोरणे, ठेकेदारांची माणसे असल्याचे दाखवून दिवसा ढवळ्या केबल चोरणे असे प्रकार होत असल्याचे पुढे येत आहे. यामुळे ग्रामस्थ, शेतकरी धास्तावलेले आहेत. या प्रकरणी हाती लागलेल्या चोरट्यांची चौकशी झाली तर यात मोठे मासे पोलिसांच्या हाती लागण्याची दाट शक्यता आहे. पोलिसांनी गस्त वाढवून असे अवैध प्रकार थांबवावेत, अशी मागणी होत आहे.
--- कॅप्शन : अजिंठ्यातील याच विद्युत खांबांवरील केबळ चोरण्याचा प्रयत्न झाला होता.
130521\img-20210511-wa0428.jpg
अजिंठा येथील याच विद्युत खांबावरील केबल चोरट्याने चोरण्याचा प्रयत्न केला