६ हजारांच्या वादातून मित्राची हत्या, त्याचा चाकू हिसकावून त्यालाच संपविल्याची आरोपीची कबुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2021 12:50 PM2021-12-18T12:50:33+5:302021-12-18T12:54:09+5:30
सोबत दारू पिल्यानंतर दोघांमध्ये वाद झाले आणि याचे पर्यवसन एकाच्या खुनात झाले
औरंगाबाद : अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या निर्घृण खुनाचा उलगडा करण्यात शहर पोलिसांना २४ तासांत यश मिळाले. गुन्हे शाखेने आरोपी आनंद दिलीपराव टेकाळे (२१, रा. हिवरा, ता. बदनापूर, जि. जालना, ह. मु. एन ६, सिडको) यास अटक केल्याची माहिती निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली. कृष्णाचे आरोपीकडे सहा हजार रुपये होते, त्या वादातून हा प्रकार घडल्याची कबुली आरोपीने दिली.
कृष्णा शेषराव जाधव या तरुणाचा हिमायतबागेत निर्घृण खून केलेला मृतदेह गुरुवारी दुपारी आढळला होता. खुनाच्या क्रूरतेने पोलीस विभागही चक्रावून गेला होता. कृष्णाच्या मित्रांना बेगमपुरा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यातील एकाने कृष्णा हा आनंद टेकाळेसोबत गेला होता, अशी माहिती दिली. त्यामुळे टेकाळेवर पोलिसांना संशय होता. त्याचा मोबाईल बंद होता. तसेच तो फरार झाल्यामुळे बेगमपुरा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विशाल बोडखे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, उपनिरीक्षक अमोल म्हस्के आणि कल्याण शेळके यांचे पथक त्याच्या शोधात होते. यातील उपनिरीक्षक म्हस्के यांच्या पथकाने आरोपी आनंद यास जिकठाण फाटा (ता. गंगापूर) परिसरात पकडले. त्याच्याकडून कृष्णाची बुलेट (एम.एच. २० एफएक्स ०५१२) जप्त करण्यात आली. आरोपीने खून केल्याची तत्काळ कबुलीही दिली. ही कामगिरी उपनिरीक्षक म्हस्के, सहायक फाैजदार सतीश जाधव, हवालदार सुधाकर मिसाळ, जितेंद्र ठाकूर, रवींद्र खरात, सुनील बेलकर आणि विजय पिंपळे यांच्या पथकाने केली.
मोबाईल ऑन केला अन् जाळ्यात अडकला
आरोपी आनंदने कृष्णाचा खून केल्यानंतर त्याचा मोबाईल घेऊन त्याच्याच बुलेटवर पुण्याच्या दिशेने पोबारा केला होता. पोलीस त्यांच्या मागावरच होते. मात्र त्याचे लोकेशन मिळत नव्हते. त्याचा मोबाइल लोकेशन ट्रकवर टाकला होता. त्याने एक फोन करण्यासाठी मोबाइल स्विच ऑन केल्यानंतर पोलिसांना त्याचे लोकेशन होती लागले. त्यानंतर गुन्हे शाखेचे पथक त्याच्या मागावर निघाले. तो लोणी (ता. संगमनेर) येथून बुलेटवर औरंगाबादच्या दिशेने येत होता. दहेगाव परिसरात त्यास ताब्यात घेतले.
बोलाचालीतून वादावादी अन् चाकू हल्ला
कृष्णा याने बुधवारी रात्री ९ वाजता १५ ते २० मिनिटांत बाहेर जाऊन येतो, असे म्हणून घर सोडले होते. कृष्णासह त्याचे चार मित्र भाई उद्धवराव पाटील यांच्या पुतळ्याच्या परिसरात जमले होते. त्यामध्ये आरोपी आनंद टेकाळेही होता. गप्पा मारल्यानंतर दोन मित्रांना चुकवून कृष्णा आणि आनंद हे दोघे बुलेटवर हिमायतबागेत गेले. घटनास्थळी मद्यपान केले. मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास कृष्णाने आनंदला ‘दारू पिण्यासह इतर ठिकाणी खर्च करताेस, तर मी दिलेले ६ हजार रुपये परत का करत नाहीस?’ असा सवाल केला. त्यावरून दोघांत वाद झाला. तेव्हा कृष्णाने आनंदवर चाकू हल्ला चढवला. त्याने दोन वार चुकविले, पण एक वार त्याच्या छातीला आणि हाताला लागला. त्याचवेळी आनंदने कृष्णाचाच चाकू घेत त्याच्यावर अंदाधुंदपणे सपासप वार केले. यातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर कृष्णाची दुचाकी आणि मोबाइल घेऊन पुण्याच्या दिशेने निघून आलो, अशी कबुली आरोपीने दिल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
शेतकरी आई-वडिलांनी शिक्षणासाठी पाठविले
आरोपी आनंद हा मूळ बदनापूर तालुक्यातील हिवरा गावचा. त्याचे आई-वडील शेती करतात. त्यास एक भाऊ आणि बहिणी आहे. वडिलांनी त्याला औरंगाबादेत शिक्षणासाठी पाठविले होते. मध्य वस्तीत असलेल्या एका खासगी संस्थेत हॉटेल मॅनेजमेंटच्या तृतीय वर्षात आनंद शिक्षण घेतो. घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे अधिक पैसे मिळत नव्हते, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. कृष्णा आणि आनंद एकमेकांसाेबत कायम फिरत होते, अशी कबुली आरोपीने दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिक तपास उपनिरीक्षक विशाल बोडखे करीत आहेत.
हेही वाचा - भावाच्या शोधात बहिण वडिलांसह हिमायतबागेत पोहोचली, समोरचे दृष्य पाहताच फोडला हंबरडा