छत्रपती संभाजीनगर ऑनर किलिंग: दुसऱ्या जावायाकडे लपलेल्या सासऱ्याला ठोकल्या बेड्या

By राम शिनगारे | Published: July 28, 2024 09:04 PM2024-07-28T21:04:36+5:302024-07-28T21:05:09+5:30

मदत करणाऱ्या जावायालाही बनवले आरोपी

accused in Chhatrapati Sambhajinagar honor killing case arrested | छत्रपती संभाजीनगर ऑनर किलिंग: दुसऱ्या जावायाकडे लपलेल्या सासऱ्याला ठोकल्या बेड्या

छत्रपती संभाजीनगर ऑनर किलिंग: दुसऱ्या जावायाकडे लपलेल्या सासऱ्याला ठोकल्या बेड्या

छत्रपती संभाजीनगर : आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्यामुळे जावयाचा खून करणारा सासरा जालना येथील दुसऱ्या जावयाकडे लपून बसला होता. त्यास शहर पोलिसांनी रविवारी (उि.२८) बेड्या ठोकल्या. त्याचवेळी आरोपीला मदत करणाऱ्या जावयालाही आरोपी करीत अटक केली. त्यामुळे या घटनेतील आरोपींची संख्या तीनवर पोहचल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुरज बडगुजर यांनी दिली.

मृत अमित साळुंके यांनी २ मे रोजी इंदिरानगरातील विद्या गीताराम कीर्तिशाही हिच्यासोबत पुण्यात आंतरधर्मीय प्रेमविवाह केला होता. या लग्नाला विद्याच्या कुटुंबियांचा विरोध होता. त्यामुळे नवदांम्पत्य महिनाभर पुण्यात राहिले. मात्र, विद्याचा वडील गीताराम आणि चुलत भाऊ अप्पासाहेब कीर्तिशाही यांच्या धमक्या सुरूच होत्या. त्यामुळे पुण्यासारख्या ठिकाणी मुलांना गाठून मारल्यास त्यांना मदतही मिळणार नाही. त्यामुळे अमितच्या कुटुंबाने त्यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलावून घेतले.

'तुझा सैराट करू'; छत्रपती संभाजीनगरात ऑनर किलिंग; मृताच्या पत्नीचे वडिलांवर गंभीर आरोप

लग्न होऊन अवघे अडीच महिने होताच आरोपी गीताराम आणि अप्पासाहेब यांनी १४ जुलैच्या रात्री अमितला गाठून चाकूने भोसकले. त्यात पोट आणि मांड्यावर आठ वार केल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. उपचार सुरू असतानाच त्याचा २५ जुलै रोजी मृत्यू झाला. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. राज्यभरात प्रकरणाची चर्चा होताच शहर पोलिसांनी शनिवारी मुख्य आरोपी अप्पासाहेब कीर्तिशाही यास बेड्या ठोकल्या. तर दुसरा आरोपी गीताराम हा फरार होता.

जवाहरनगर पोलिसांनी गिताराम कीर्तिशाही यास जालना येथील दुसऱ्या जावयाच्या घरातुन रविवारी अटक केली. लपण्यासाठी सासऱ्याला मदत करणारा दुसरा जावाई स्वप्नील पटेकर (२८, रा. जालना) यासही आरोपी बनवत अटक केली. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना १ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.

मुख्य आरोपी भाजपच्या सेलचा पदाधिकारी

ऑनर किलिंगच्या घटनेतील मुख्य आरोपी अप्पासाहेब कीर्तिशाही हा शहर भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाचा सरचिटणीस असल्याचे उघडकीस आले. त्याविषयी भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांना विचारले असता ते म्हणाले, घटना उघडकीस आल्यानंतर संबंधित पदाधिकाऱ्यास पदमुक्त केले आहे. त्यामुळे आरोपीचा आणि भाजपचा काहीही संबंध नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: accused in Chhatrapati Sambhajinagar honor killing case arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.