काळेगाव घाट येथील बहुचर्चित रेडिओ स्फोट प्रकरणातील आरोपी खंडपीठात निर्दोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:04 AM2021-07-20T04:04:56+5:302021-07-20T04:04:56+5:30
काय होते प्रकरण केंद्रेवाडी येथील आबा गिरी याचे गावातील गोपीनाथ तरकसे यांच्यासोबत शेतीवरून भांडण सुरू होते. त्यामुळे तरकसे ...
काय होते प्रकरण
केंद्रेवाडी येथील आबा गिरी याचे गावातील गोपीनाथ तरकसे यांच्यासोबत शेतीवरून भांडण सुरू होते. त्यामुळे तरकसे यांचा बदला घेण्याच्या उद्देशाने आबा गिरीने नांदूरघाट येथील दत्ता जाधव यांच्याकडून जिलेटिन कांड्या घेऊन रेडिओ स्फोटचा कट रचला. रेडिओचे पार्सल बसमध्येच राहिले. बसचा वाहक ओम रमेश निंबाळकर याने तो रेडिओ घरी नेला. तो रेडिओ चालू करताच झालेल्या स्फोटात ओम निंबाळकर यांचे दोन्ही हात निकामी झाले. पत्नी उषा हिला पाय गमवावे लागले. चार वर्षांचा मुलगा कुणाल याचे दोन्ही डोळे गेले. आई कुसुमबाई यांना अपंगत्व आले होते.
सत्र न्यायालयाने सुनावली शिक्षा
अंबाजोगाई येथील सत्र न्यायालयाने आबा गिरी याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. स्फोटासाठी जिलेटिनच्या कांड्या पुरवल्याचा आरोप असलेला दत्ता साहेबराव जाधव याची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. या शिक्षेविरुद्ध गिरी याने औरंगाबाद खंडपीठात फौजदारी अपील दाखल केले होते.
खंडपीठात निर्दोष
आबा गिरी यानेच रेडिओचे पार्सल बसमध्ये ठेवल्याचा पुरावा नाही, तसेच रेडिओमध्ये सेल टाकल्याबरोबर स्फोट होईल असे सर्किट तयार करण्याएवढा आरोपी तज्ज्ञ नाही, असे निरीक्षण नोंदवीत संशयाचा फायदा देऊन उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा रद्दबातल करून आबा गिरी याची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. श्रीकृष्ण सोळंके आणि ॲड. अनंत तिडके यांनी सहकार्य केले.