छत्रपती संभाजीनगराजवळील ३५ गावांना येणार ‘अच्छे दिन’; मनपा देणार मूलभूत सोयीसुविधा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 04:23 PM2024-08-07T16:23:03+5:302024-08-07T16:24:14+5:30
शहराला ज्या दिवशी अतिरिक्त पाणी होईल, त्या दिवशी आम्ही मनपा हद्दीला लागून असलेल्या गावांना पाणी देणार आहोत. हा शासनाचाच निर्णय आहे.
छत्रपती संभाजीनगर : मनपा हद्दीच्या बाहेरील गावांमध्ये झपाट्याने लोकसंख्या वाढत आहे. शहराजवळील ३५ गावांमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी, कचऱ्यावर प्रक्रिया, ड्रेनेजच्या पाण्यावर प्रक्रिया होत नाही. आता महापालिका प्रशासन या गावांना मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी सामंजस्य करार करणार आहे. त्यामुळे या गावांना लवकरच ‘अच्छे दिन’ येणार आहेत.
मनपा प्रशासक जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून शहराजवळील ३५ गावांमध्ये घनकचरा, पाणीपुरवठा आणि मलजल निस्सारण प्रक्रिया योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी मंगळवारी सकाळी स्मार्ट सिटी कार्यालयात सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवकांची बैठक घेण्यात आली. झालर पट्ट्यातील २६ आणि यात समावेश नसलेल्या ९, अशा एकूण ३५ गावांची निवड करण्यात आली. या गावांमध्ये ग्रामपंचायतींमार्फत पाहिजे तसा विकास झाला नाही. त्यामुळे मनपाने आता विकासाच्या कक्षा रुंदावत या गावांना मूलभूत सोयीसुविधा देण्याचा निर्णय घेतला. बैठकीस मनपाचे अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, संतोष वाहुळे, उपायुक्त रवींद्र जोगदंड, जि. प. जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले, कार्यकारी अभियंता अजित वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, विस्तार अधिकारी, तज्ज्ञ सल्लागार आदींची उपस्थिती होती.
कचरा मनपाला आणून द्या
३५ ग्रामपंचायतींनी गावातील ओला व सुका कचरा वर्गीकरण करून महापालिकेच्या चिकलठाणा, पडेगाव, हर्सूल येथील कचरा प्रक्रिया केंद्रावर आणून दिल्यास त्यावर प्रक्रिया केली जाईल, असे प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले. तर जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना म्हणाले की, गावात कचऱ्याचे नियंत्रण करणे अत्यंत सोपे आहे. मुख्य रस्त्यावरील दुकाने, हॉटेल, गृहनिर्माण सोसायटी व परिसरातील रहिवाशांनी आपला कचरा वर्गीकरण करून देण्याची सवय लावावी. नागरिक कचरा वर्गीकरण करून देत नसतील तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशी सूचना प्रशासकांनी केली. मांडकीच्या सरपंचाने नारेगाव येथील कचरा डेपो हटविण्याची मागणी केली. यावर मनपा प्रशासकांनी लवकरच संपूर्ण कचरा नष्ट होईल, असे सांगितले.
प्रत्येक गावात ड्रेनेजच्या पाण्यावर प्रक्रिया
३५ गावांमध्ये मलजल निस्सारण प्रक्रिया प्रकल्प राबविण्यात येत असले तरी ड्रेनेजच्या पाण्यावर प्रक्रिया होत नाही. महापालिका छोटे ट्रिटमेंट प्लान्ट उभारण्यासाठी तांत्रिक सहकार्य करेल. ट्रिटमेंट केलेले पाणी शेतीसाठी वापरता येणार असल्याचे प्रशासकांनी सांगितले.
विहिरींचे पाणी दूषित
चिकलठाणा येथील मनपाच्या सिवरेज ट्रिटमेंट प्लांटमधून वाहणाऱ्या अतिरिक्त पाण्यामुळे झाल्टा, हिरापूर येथील विहिरींचे पाणी दूषित झाल्याची तक्रार सरपंचांनी केली. त्यावर प्रशासकांनी लक्ष घालतो असे सांगितले. स्मार्ट सिटीने उभारलेल्या ७०० सीसीटीव्ही कॅमेरे प्रकल्पाच्या कंट्रोल रूमची सरपंचांनी पाहणी केली.
शुद्ध पिण्याचे पाणी देणार
केंद्र शासन ‘हर घर जलमिशन’ अभियान राबवत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत ३५ गावांत जलकुंभ उभारण्याचे सुरू आहे. शहरासाठी राबविण्यात येत असलेल्या ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीद्वारे भविष्यात पाणीपुरवठा केला जाईल. २०५४ पर्यंत ३५ गावांच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी आराखडा तयार असल्याचे मनपा प्रशासकांनी सांगितले.
अगोदर शहर नंतर झालरची गावे
शहराला ज्या दिवशी अतिरिक्त पाणी होईल, त्या दिवशी आम्ही मनपा हद्दीला लागून असलेल्या गावांना पाणी देणार आहोत. हा शासनाचाच निर्णय आहे. पाणी मोफत दिले जाणार नाही. आसपासच्या गावांचा कचरा मनपा हद्दीत आणून टाकला जातो. हे बरोबर नाही. त्यांनी घंटागाडीद्वारे कचरा आमच्या प्रक्रिया केंद्रात आणून द्यावा. आम्ही प्रक्रिया करू, त्यासाठीही शुल्क आकारले जाईल. ज्या गावांजवळ मनपाची ड्रेनेज यंत्रणा आहे, तेथे त्यांनी जोडावी. त्याचेही युजर चार्ज मनपा कराराद्वारे घेईल. जिथे ड्रेनेज यंत्रणा नाही, त्या गावात छोटासे ३० ते ४० लाखांत ड्रेनेज ट्रिटमेंट प्लँट उभारावे. त्याचा खर्च ग्रामपंचायत करेल, असे मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.