जुन्या दराने जमीन अधिग्रहण, घोळ महसूल अधिकाऱ्याचा; लाखोंचा चुना शेतकऱ्यांना

By बापू सोळुंके | Published: June 13, 2023 07:11 PM2023-06-13T19:11:40+5:302023-06-13T19:12:17+5:30

तुटपुंजा मोबदला, बागायती जमिनी काेरडवाहू दाखविल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.

Acquisition of land at old rates, by scam by Revenue Officer; Lakhs of lost farmers | जुन्या दराने जमीन अधिग्रहण, घोळ महसूल अधिकाऱ्याचा; लाखोंचा चुना शेतकऱ्यांना

जुन्या दराने जमीन अधिग्रहण, घोळ महसूल अधिकाऱ्याचा; लाखोंचा चुना शेतकऱ्यांना

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : नांदूर मधमेश्वर कालवा, वितरिका, उपवितरकांसाठी जलसंपदा विभागाने संपादित जमिनीचा थेट खरेदी धोरण कायद्यानुसार मोबदला देताना एकूण मोबदल्याच्या २५ टक्के वाढीव रक्कम देणे बंधनकारक आहे. यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील भूसंपादन अधिकाऱ्यांनी तेथील शेतकऱ्यांना कायद्यानुसार मोबदला दिला. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यातील भूसंपादन अधिकाऱ्यांनी वैजापूर, गंगापूर तालुक्यांतील हजारो शेतकऱ्यांना एकूण मोबदल्याच्या केवळ १२.५ टक्केच मोबदला देऊन नुकसान केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

जलसंपदा विभागाने २००२ ते २०१२ या कालावधीत नांदूर- मधमेश्वर कालव्यासाठी वैजापूर ४५ गावे आणि गंगापूर तालुक्यांतील २५ तर कोपरगाव तालुक्यातील ७ गावांतील शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर जमीन संपादित केली होती. नांदूर -मधमेश्वर कालवा लवकर व्हावा, यासाठी शेतकऱ्यांनी विनाअट त्यांच्या जमिनी दिल्या होत्या. या कालव्यामुळे वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातील ७० गावांना दरवर्षी कालव्यातून पाणी मिळत असल्याने त्यांच्या जमिनी बागायती झाल्या आहेत.

या शेतकऱ्यांना संपादित जमिनीचा मावेजा २०१२ नंतर शासनाने देण्यास सुरुवात केली. कोणत्याही प्रकल्पासासाठी जमीन थेट खरेदीने घेताना भूसंपादन कायदा २०१३ मधील कलम २६ ते ३०च्या व शेड्युल १ च्या तरतुदीनुसार संबंधित जमिनीसाठी देय होणाऱ्या मोबदल्याची परिगणना जमिनीशी संबंधित सर्व बाबींची विचारात घेऊन करावी. त्यानंतर परिगणित होणाऱ्या एकूण मोबदल्याच्या रक्कमेवर २५ टक्के रक्कम वाढीव देण्यात यावी, असा नियम आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांनी मात्र असे केले नाही. एवढेच नव्हे तर काही प्रकरणांत अचूक परिगणना न करता शेतकऱ्यांना तुटपुंजा मोबदला दिला. बागायती जमिनी काेरडवाहू दाखविल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.

काय म्हणतात शेतकरी ?
नागमठाण (ता.वैजापूर) येथे ४७ आर. जमीन नांदूर मधमेश्वर कालव्याच्या वितरकीसाठी संपादित करण्यात आली. आम्हाला २५ टक्के वाढीव मोबदला दिला नाही. अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणल्यानंतर त्यांनी आम्हाला कोर्टाकडून आदेश आणण्याचे सांगितले.
- सोन्याबापू कचरू शिरसाट (शेतकरी)

अधिकाऱ्यांनी अन्याय केला
वैजापूर तालुक्यातील लाखगंगा येथे २० आर. जमीन संपादित करण्यात आली. मोबदला २०१६ साली प्रति गुंठा दोन हजार रुपये या दराने देण्यात आला. माझ्यासह वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांवर भूसंपादन अधिकाऱ्यांनी अन्याय केला.
- पंडित भानुदास शिंदे (रा. डोंगरी,धोत्रे ,ता. कोपरगाव)

Web Title: Acquisition of land at old rates, by scam by Revenue Officer; Lakhs of lost farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.