दहा महिन्यांत ११ हजार जणांवर कारवाई; तरीही ट्रिपल सीट जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2020 10:21 AM2020-11-15T10:21:21+5:302020-11-15T10:25:02+5:30
शहर वाहतूक पोलिसांनी ट्रिपल सीट वाहनचालक, विना हेल्मेट, विना सीटबेल्ट आणि अन्य वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे.
औरंगाबाद : कितीही कारवाई, दंड करा; पण शहरातील बेशिस्त वाहनचालक सुधारायला तयार नाहीत. वाहतूक पोलिसांनी गेल्या १० महिन्यांत तब्बल ११ हजार ६७४ ट्रिपल सीट दुचाकीस्वारांवर कारवाई केली. गतवर्षीच्या तुलनेत ही अडीचपट अधिक कारवाई असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. असे असले तरी शहरात दुचाकीवर ट्रिपल सीट जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
वाहतूक नियम तोडल्याने अपघाताला निमंत्रण मिळते, हे सर्वश्रुत आहे. शहर वाहतूक पोलिसांनी ट्रिपल सीट वाहनचालक, विना हेल्मेट, विना सीटबेल्ट आणि अन्य वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. शहरातील बेशिस्त वाहतूक व्यवस्थेला वळण लावण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शहर, सिडको, छावणी आणि वाळूज वाहतूक शाखा कार्यरत आहे. ट्रिपल सीट दुचाकीस्वारांमुळे अपघाताचा धोका अधिक असतो. ही बाब लक्षात घेऊन सातत्याने ट्रीपल सीट दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलीस कारवाई करीत आहेत. दहा महिन्यांत शहरातील बेशिस्त ११ हजार ६७४ ट्रिपलसीट दुचाकीचालकांवर पोलिसांनी कारवाई केली. गतवर्षी शहर पोलिसांनी ४ हजार २५३ ट्रिपल सीट दुचाकीचालकांना दंड ठोठावला होता. यावर्षी कोरोना कहरात तब्बल चार महिने विनापरवानगी घराबाहेर पडण्यास मनाई होती. असे असतानाही कारवाई वाढल्याचे दिसून येते.
सिडको वाहतूक शाखेची महिनाभरात दीड हजार ट्रिपल सीट असणाऱ्यांवर कारवाई
सिडको वाहतूक शाखेने ऑक्टोबर महिन्यात दीड हजार दुचाकीस्वारांवर कारवाई करून त्यांच्याकडून तीन लाख रुपये दंड वसूल केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. सिडको वाहतूक शाखेसोबतच शहर वाहतूक शाखेनेही अशीच कारवाई केली.