नो एन्ट्रीत प्रवेश करणा-या १४ ट्रॅव्हल्स बसेसवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 01:15 AM2017-10-16T01:15:08+5:302017-10-16T01:15:08+5:30
अपघाताचा धोका टाळण्यासाठी खाजगी ट्रॅव्हल्स बसेसला सकाळी ७ ते रात्री ११ या कालावधीत प्रवेश बंदी करण्यात आली आहे. असे असताना रविवारी सकाळी ८ वाजता बिनधास्तपणे घुसलेल्या विविध टॅव्हल्सच्या १४ खाजगी बसेसवर सिडको वाहतूक शाखेने कारवाई केली
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : अपघाताचा धोका टाळण्यासाठी खाजगी ट्रॅव्हल्स बसेसला सकाळी ७ ते रात्री ११ या कालावधीत प्रवेश बंदी करण्यात आली आहे. असे असताना रविवारी सकाळी ८ वाजता बिनधास्तपणे घुसलेल्या विविध टॅव्हल्सच्या १४ खाजगी बसेसवर सिडको वाहतूक शाखेने कारवाई केली. या कारवाईत त्यांच्याकडून १६ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या विविध बसेस नियमित प्रवासी वाहतूक करीत असतात. खाजगी ट्रॅव्हल्स बसेसमुळे शहरात अनेक प्राणान्तिक अपघात झालेले आहेत. या बसेसचा वाढता धोका लक्षात घेत शहर पोलिसांनी ट्रॅव्हल्स बसेसना सकाळी ७ ते रात्री ११ या कालावीत नो एन्ट्री केली आहे. याबाबतची माहिती वाहतूक विभागाने ट्रॅव्हल्स कंपन्यांना कळविली आहे. शिवाय वाहतूक शाखेच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आलेली आहे. असे असताना जालन्याकडून येणा-या खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसेस नो एन्ट्रीत शहरात प्रवेश करीत असल्याची माहिती वाहतूक पोलिसांना मिळाली. यामुळे सिडको वाहतूक शाखेचे निरीक्षक गिरमे, पोलीस उपनिरीक्षक पी.एम. नवघरे आणि कर्मचाºयांनी रविवारी सकाळी ८ वाजता ट्रॅव्हल्सविरोधात कारवाईसाठी मोहीम उघडली. पाहता-पाहता अर्ध्या तासात १४ खाजगी बसेस त्यांनी पकडल्या. वसंतराव नाईक चौकात सर्व ट्रॅव्हल्सचालकांना नो एन्ट्रीत प्रवेश केल्याबद्दल बाराशे रुपये दंडाची पावती देण्यात आली. या कारवाईने बसचालकांमध्ये खळबळ उडाली.